भायखळा येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास १९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडे सोपविण्यात आला होता.
भायखळा येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेले सचिन कुर्मी यांची ४ ऑक्टोबर रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी आनंदा अशोक काळे उर्फ अन्या, विजय ज्ञानेश्वर काकडे उर्फ पप्या आणि प्रफुल्ल प्रवीण पाटकर या तिघांना अटक केली आहे.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास १६ ऑक्टोबर रोजी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास युनिट ३ करीत आहे. कुर्मी यांची हत्येत आणखी काही जणांच्या समावेश असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता, हत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी ही हत्या संघटित टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुरावे आणि आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासाच्या आधारे पोलिसांनी मकोका लागू करण्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर शनिवारी गुन्हे शाखेने अटक आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिली.
हे ही वाचा:
बांगलादेश पीडितांसाठी ठोस पावले उचला, ममतांचे मोदींना आवाहन
संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानावर चर्चा होणार
मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: २१ बँक खात्यांमधून ८०० कोटींचे व्यवहार
मशिदींचे सर्वेक्षण थांबवा, काँग्रेस नेत्यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
सचिन कुर्मी खून प्रकरणात अटक आरोपी अन्या काळे याच्यावर ६ ते ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. भायखळा येथील घोडपदेव परिसरात ४ ऑक्टोबर रोजी सचिन कुर्मी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मंत्री छगन भुजबळ यांनी ११ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. या खून प्रकरणाचा अधिक सखोल तपास होण्याची गरज असल्याचे सांगत भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांना ही विनंती केली आहे. तपास अधिक प्रभावी आणि निःपक्षपाती होण्यासाठी तो गुन्हे शाखा किंवा एसआयटीकडे वर्ग करण्यात यावा, यावर त्यांनी भर दिला.