मुंबईला पडलेल्या ड्रग्स विक्रेत्यांचा विळखा मोडून काढण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने अंधेरी पश्चिम गावदेवी डोंगरी परिसरात बुधवारी रात्री छापा टाकून ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांची परिसरातून वरात काढण्यात आली, या वराती दरम्यान “आम्ही ड्रग्स विक्री करायचो, यापुढे ड्रग्स विक्री करणार नाही, असे त्यांना बोलायला लावून गावदेवी डोंगरी ते पोलीस ठाण्यापर्यत त्यांची पायी वरात काढण्यात आली.
ड्रग्स माफियांच्या या वरातीचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वस्तरातुन मुंबई पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. आफताब बेग, मोहम्मद अयान हनीफ शेख, अरबाज करीम तुर्की आणि शेरबाने मोहम्मद हसिम सिद्दीकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ही टोळी मागील अनेक वर्षांपासून अंधेरी पश्चिम गावदेवी डोंगरी,जुहू गल्ली इत्यादी परिसरात अमली पदार्थाची विक्री तसेच तस्करी करीत होती, स्थानिकामध्ये या टोळीची दहशत असल्यामुळे या टोळीच्या विरोधात जाण्यास स्थानिक नागरिक घाबरत होते.
या टोळीकडून तरुण पिढी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना अमली पदार्थाच्या व्यसनात लोटत होती.
मुंबई गुन्हे शाखेला अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली, गुन्हे शाखा कक्ष ९चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने या टोळीवर लक्ष ठेवून होते, अखेर बुधवारी रात्री गुन्हे शाखेने अंधेरी पश्चिम गावदेवी डोंगरी येथे छापा टाकून आफताब बेग, मोहम्मद अयान हनीफ शेख, अरबाज करीम तुर्की आणि शेरबाने मोहम्मद हसिम सिद्दीकी या टोळीच्या मुसक्या आवळत, या टोळीची परिसरातुनच वरात काढण्यात आली.
या दरम्यान या टोळीकडून पोलिसांनी संपूर्ण कबुली घेत ‘ आम्ही ड्रग्स विक्री करायचो, यापुढे ड्रग्सची विक्री करणार नाही, असे जोर जोराने बोलत त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत चालत वरात काढण्यात आली. गुन्हे शाखेच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले तसेच मुंबई पोलिसांचे कौतुक करण्यात येत होते.या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला, आणि संपूर्ण स्तरातून मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.अटक करण्यात आलेल्या या टोळीतील चार ही जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.