महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करून लाच मागितल्याप्रकरणी संशयित ‘बुकी’ अनिल जयसिंघानी यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळला. या प्रकरणात सहआरोपी असलेली त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल जयसिंघानी याने समानतेच्या आधारावर जामीन मागितला होता. पण अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत जामीन अर्ज फेटाळला. मात्र, अन्य आरोपी निर्मल जयसिंघानी याचा जामीन अर्ज स्वीकारला.
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरनंतर मुंबई पोलिसांनी २० मार्चला गुजरातमधून जयसिंघानीला अटक केली होती. या प्रकरणातील सहआरोपी असलेली आपली मुलगी अनिक्षा हिला जामीन मंजूर झाल्याचे सांगत जयसिंघानी यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. एवढेच नाही तर जामीन अर्जावरील चर्चेदरम्यान अनिल जयसिंघानी यांच्या वकिलाने त्यांच्या अशिलाच्या वैद्यकीय स्थितीचा हवालाही दिला होता.
विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी हा संपूर्ण कट अनिल जयसिंघानी यांच्यासाठी रचल्याचे सांगत जामीन अर्जाला विरोध केला होता. अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत दावा केला होता की, अनिक्षाने तिच्या वडिलांविरोधात दाखल केलेल्या खटल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी लाच देऊ केली होती.
विशेष सरकारी वकील म्हणाले की, याचिकाकर्त्याच्या भूमिकेची चौकशी करणे आवश्यक आहे. ते म्हणाले, “एखाद्या आरोपीला जामीन मिळाला असल्याने त्याचीही जामिनावर सुटका व्हावी, असे म्हणता येणार नाही. त्यावर फिर्यादीने असा युक्तिवाद केला की आरोपी त्याच्यावर नोंदवलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार आहे, त्यामुळे आपलाही विचार करणे आवश्यक आहे. अनिल जयसिंघानी यांच्या प्रकृतीबाबत विशेष सरकारी वकील म्हणाले की, त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालावरून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे दिसून येते असे सांगितले.
हे ही वाचा:
देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’
अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?
घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला
मलबार हिल पोलिस स्टेशनने २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी आणि त्यांची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याबद्दल एफआयआर नोंदवला होता. यामध्ये अमृता फडणवीस अनिक्षाची मदत घेत असल्याचे दाखवण्यात आले होते. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या गुन्हेगारी कट, खंडणी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.