मुंबईसह ठाण्यात २५पेक्षा अधिक बाईक्स चोरीचे गुन्हे दाखल असलेला सराईत मोटारसायकल चोर हा पोलीस कोठडीचे गज (रॉड) वाकवून पळून गेल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे घडली. आरोपी हा शरीरयष्टीने बारीक असल्यामुळे त्याला सहज खिडकीतून बाहेर पडता आले असून पळून गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक त्याच्या गावी रवाना झाले आहे.
राम सखाराम काकड (१९) असे या सराईत मोटारसायकल चोराचे नाव आहे. राम काकड हा आरोपी शहापूर तालुक्यातील पिवळी येथे राहणारा आहे. कल्याण तालुका पोलिसांनी राम काकड याला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याला कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत असलेल्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच्या पहाऱ्यावर तालुका पोलीस ठाण्याचे ए.एस.आय रामचंद्र मिसाळ यांना ठेवण्यात आले होते.
बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मिसाळ हे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला बघायला गेलं असता त्यांना धक्काच बसला, पोलीस कोठडीत असलेल्या खिडकीचे गज वाकवलेले होते, व आरोपी काकड हा कोठडीत दिसून न आल्यामुळे त्यांनी ही बाब इतर पहारेकरी पोलिसाच्या लक्षात आणून दिली. मिसाळ आणि इतर पोलीस शिपायांनी परिसरात त्याचा शोध घेतला मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी तेथून पसार झाला.
हे ही वाचा:
मुंबई इंडियन्स ‘आकाश’ भरून पावले
बिजू जनता दलाचे ठरले! संसद भवन कार्यक्रमाला उपस्थित राहणार
कोकणातील गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात कसे फुल होते?
बिजू जनता दलाचे ठरले! संसद भवन कार्यक्रमाला उपस्थित राहणार
आरोपीची शरीरयष्टी बारीक असल्यामुळे तसेच कोठडीच्या खिडकीचे गज कमकुवत असल्यामुळे त्याला खिडकीतून बाहेर निघता आले व त्याने तेथून पोबारा केला असावा अशी माहिती पोलिसानी दिली. काकड या आरोपीवर ठाणे, मुंबई, पालघर तसेच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात २५ पेक्षा अधिक मोटारसायकल चोरीचे गुन्हे आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी एक पथक तयार करून त्याच्या गावी व राहत्या ठिकाणी शोध घेण्यात येत आहे.