विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह

मृत उमा तावडे यांचे पती वेगळे राहात होते तर मुलगा हा काहीसा मनोरुग्णासारखा होता

विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह

विक्रोळी पूर्वेतील म्हाडा वसाहतीत आई आणि २२ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आईचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत तर मुलाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत रविवारी रात्री आढळला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिली आहे.

उमा संजय तावडे (५४) आणि अभिषेक तावडे (२२) असे मृतावस्थेत आढळलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. उमा तावडे आणि अभिषेक हे दोघे विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर क्रमांक २ गुलमोहर इमारत येथे दुसऱ्या मजल्यावर राहण्यास होते. उमा यांचा पती संजय हा मागील काही वर्षांपासून वेगळा राहात होता. तो धारावी येथे काम करून मित्राच्या घरी राहण्यास होते, तर उमा नजीकच्या एका खाजगी क्लिनिक मध्ये कामाला होत्या व अभिषेक हा घरीच असायचा. तो काहीसा मनोरुग्णासारखा होता अशी माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिली.

उमा तावडे यांचा पती आठवड्यातून एक दोन वेळा कुटुंबांना भेटण्यासाठी विक्रोळी येत असे. नेहमी प्रमाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पती संजय हे घरी आले घराच्या दाराला आतून कडी लावलेली होती. पती संजय यांनी बराच वेळ दार ठोठावले परंतु आतून काही हालचाल होत नसल्यामुळे त्यांना संशय आला व त्याने पोलिसांना कळवले. विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी देखील दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही आतून दार उघडत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

हे ही वाचा:

एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!

आयपीएल फायनलनंतर ऋतुराज गायकवाडची उत्कर्षाशी जोडी जमली!

प्रयागराजमध्ये महिला पोलिसालाच बसला ‘लव्ह जिहाद’चा फटका

अग्निशमन दलाने दार तोडून आत प्रवेश केला असता उमा तावडे मृत अवस्थेत हॉलच्या बेडवर पडलेल्या होत्या व मुलगा अभिषेक हा बेडरूममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला अशी माहिती चव्हाण यांनी दिली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना घरात कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट किंवा संशयास्पद आढळून आलेले नाही, मुलगा अभिषेक याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासा वरून स्पष्ट होत असले तरी उमा तावडे यांच्या मृत्यु कशामुळे झाला याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

Exit mobile version