मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
बेबीताई बाळाराम काकडे (४८) आणि नितीन बाळाराम काकडे (२४) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. भिवंडी येथील आमनेपाडा येथे बेबीताई आणि नितीन राहत होते. महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी त्यास कोणताही दुजोरा दिलेला नाही.
आमनेपाडा येथे राहणारे नितीन आणि बेबीताई गुरुवारी सकाळी पूर्णा येथील त्यांच्या नातेवाईकांकडे गणपती दर्शनासाठी गेले होते. नातेवाईकांकडून दुपारी ते घरी येण्यास निघाले होते. घरी परतत असताना मुंबई- नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने मानकोली जवळील लोढा धाम येथे त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बेबीताई यांच्या डोक्याला आणि नितीन याच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेने आमनेपाडा गावावर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा:
दादर, मुलुंडमधील लोक वैतागले दूषित पाण्याला
‘शहापूर- खोपोली मार्गाचे काम राज्याकडे सोपवले ही मोठी चूक’
तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी
… म्हणून त्यांनी चोरल्या सव्वादहा लाखांच्या बाईक!
या अपघाताप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुंबई- नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा अपघात खड्ड्यांमुळे झाल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.