मॉरिस युट्युबवरून घेत होता बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण

गुन्हे शाखेकडून अधिकचा तपास सुरू

मॉरिस युट्युबवरून घेत होता बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण

दहिसरमधील माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. शिवाय फेसबुक लाइव्ह दरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोन्हा यानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी मॉरिस नरोन्हाने यूट्युबवर सर्च केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

मॉरिस नरोन्हा याने बंदूक कशी हाताळायची यासाठी यूट्युबवर सर्च केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून व्हिडीओ पाहून प्रशिक्षण घेत गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. साडी वाटपाच्या कार्यक्रमाला बोलावून नरोन्हाने घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी नरोन्हाने बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीचा वापर केल्याने पोलिसांनी मिश्राला बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार मिश्रा याला कामाची आवश्यकता होती. दोन महिन्यांपूर्वी नरोन्हा याने मिश्रा याला कामाची ऑफर दिली होती. मात्र, कामावर ठेवण्यापूर्वी शस्त्र ऑफिसमध्ये ठेवून जाण्याची अट घातली होती. त्यानुसार मिश्रा डिसेंबरमध्ये नोकरीवर रुजू झाला. त्याला ४० हजार पगार देत होते. त्यामुळे मॉरिसने डिसेंबरमध्येच हत्येचा कट शिजवल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अमरेंद्र मिश्रा १३ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत होता. मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमरेंद्र मिश्रा याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या हत्येच्या कटातून अमरेंद्रला काही फायदा झाला का? याची चौकशी करायची असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना केली. त्यांच्या या मागणीला मिश्राच्या वकिलांनी विरोध केला. मिश्राने आतापर्यंत पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांना हवी ती माहिती दिली आहे. त्यामुळे त्याला आणखी पोलिस कोठडी सुनावण्यात येऊ नये, असे मिश्राच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले.

प्रकरण काय?

मॉरिस हा दहिसर- बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. या परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. अभिषेक घोसाळकरांनी मॉरिस विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये वाद झाले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी वाद मिटवून दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत असताना मॉरिसने गोळ्या झाडल्या.

Exit mobile version