मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनचोरीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षात तब्बल २३५ गाड्या चोरीला गेल्या आहेत आणि तसे गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु त्यातील केवळ १०० वाहनांचा तपास लागलेला आहे. मध्यंतरी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विक्रांत देसाई याची बुलेट चोरण्यात आली होती. परळ येथील आर. एम. भट व्यायामशाळेच्या गेटजवळून एका तरूणाने ही बुलेट चोरून नेली होती. भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली असून, पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत. त्यामुळेच आता वाहनचोरी ही अनेक नागरिकांसाठी चिंतेची बाब झालेली आहे. अनेक सोसायटीमध्ये वाहन ठेवण्यास जागा नसल्याने, बाहेर एखाद्या गल्लीत बाईक लावली जाते. अशावेळी वाहनचोरीचे प्रमाण अधिक दिसून आलेले आहे.
लॉकडाउनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याने वाहनचोरींच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. तसेच घराजवळ, सोसायटीच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या गाड्या चोरीला जाण्याच्या घटना याकाळात खूपच वाढल्या. चोरी होणाऱ्या वाहनांमध्ये महागड्या कार, रिक्षा, दुचाकींचा समावेश असून सर्वाधिक प्रमाण हे दुचाकीचे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण मात्र फारच कमी आहे.
हे ही वाचा:
खळबळजनक! आग्रीपाड्यात बोर्डिंग स्कूलमध्ये २६ मुले कोरोनाबाधित
राष्ट्रकुल सुवर्ण विजेते,महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख कालवश
अफगाणिस्तानात तालिबान; त्यामुळे जिन्स ‘बॅन’
चोरांच्या गुन्हेपद्धती, वाहनचोरांच्या टोळ्या तसेच, चोरीच्या वाहनांची लावण्यात येणारी विल्हेवाट याबाबत पुरेशी माहिती नसल्याने चोरीला गेलेली गाडी सापडणे कठीण ठरते. मुंबईत लावलेल्या सीसीटीव्हींमुळे पोलिसांना आरोपी पकडण्यासाठी काही प्रमाणात मदत होते.
मुंबईत चोरण्यात आलेली वाहने नंबर प्लेट, चेसिस नंबर बदलून पुन्हा वापरत आणली जातात किंवा परराज्यांत त्यांची विक्री केली जाते. अनेकदा त्याचे सुटे भाग करून वापरले जातात त्यामुळे गाडीची ओळख पटविणे कठीण होते. त्यामुळेच चोरीला गेलेली वाहने पुन्हा मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसून आले आहे.