मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ दोन दिवसांपूर्वी रिक्षाचालकाबरोबर झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या मारहाणीत मृत झालेला तरुण मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे कार्यकर्ता आकाश माईन (वय ३१ वर्षे) १३ ऑक्टोबर रोजी मालाड पूर्वेतील शिवाजी चौक येथून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पुढे जाणाऱ्या रिक्षा चालकाने रिक्षा अचानक वळवल्याने त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र आणि स्थानिक फेरीवाले तेथे जमले. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. लाथा- बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाशच्या पायाला, हाताला, पोटावर आणि कंबरेला मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश माईन हा विभाग सचिवांचा मुलगा असून तो हैदराबादला राहायला होता. दसऱ्यासाठी तो मुंबईत आला होता. बाईकवरून जात असताना रिक्षावाल्यांबरोबर त्याचं किरकोळ भांडण झालं. तिकडे आजूबाजूच्या रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून मॉब लिंचिग केलं. त्यानंतर त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेलं. परंतु, त्याला तिथे व्यवस्थित उपचार दिले नाहीत. तेथील डॉक्टरांनी तो आऊट ऑफ डेंजर आहे असं सांगितलं, पण घरी आल्यावर रात्री त्याचा मृत्यू झाला”, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
हे ही वाचा :
प्रभू श्रीरामांविरुद्ध अपमानजनक पोस्ट, एकाला अटक!
कॅनडाच्या ट्रुडो यांना लोक कंटाळले; कॅनडियन पत्रकाराचा दावा
कॅनडा पोलिसांचा गंभीर दावा; भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत करतात काम
बाबा सिद्दीकी प्रकरण; पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
आकाश यांची पत्नी अनुश्री माईन यांच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकु ढवळे, साहिल सिकंदर कदम यांना अटक करण्यात आली आहे. यातील अविनाश कदम विरोधात पंतनगर आणि बोरीवली पोलीस ठाण्यात मारामारी व अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर, आदित्य सिंह व जयप्रकाश आमटे विरोधात २०१९ मध्ये दिंडोशी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.