अपहरण करून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मनसे कामगार सेनेच्या चिटणीसासह ६ जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला कामगार सेनेचा चिटणीस सुजय ठोंबरे याच्याविरुद्ध यापूर्वी कुर्ला, साकिनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुजय शेखर ठोंबरे,(३०), सुनील सखाराम राणे (५६), अरुण हरिश्चंद्र बोरले (५२), अरुण धोंडीराम शिर्के (२९), रोहित प्रवीण जाधव (२४) आणि मनोहर तुकाराम चव्हाण (३९)असे अटक करण्यात आलेल्या ६ जणांची नावे आहेत. सुजय ठोंबरे हा कुर्ला पश्चिम न्यू मिल रोड, वसंत नगर येथे राहणारा असून इतर पाच जण कफपरेड, चिरा बाजार, काळबादेवी, आणि नरिमन पॉईंट येथे राहणारे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार विजय पांडुरंग मोरे हे नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथे राहण्यास आहे, मोरे हे कंत्राटदार असून फोर्ट येथे एका बँकेत कर्मचारी पुरवठा करण्याचे कंत्राट सुरू आहे.
तक्रारदार यांच्या फोर्ट येथील बँकेत काम करणाऱ्या १७ कंत्राटी कर्मचारी यांनी सोमवारी सकाळी किरकोळ कारणावरून अचानक काम बंद केले होते, याचा फायदा घेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सुजय ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारदार यांच्या कंपनीचा सुपरवायझर सुजित कुमार सरोज याला शिवीगाळ करून मारहाण केली, त्यानंतर तक्रारदार यांचे वडील पांडुरंग मोरे यांना बळजबरीने वाहनात बसवून दादर येथील कामगार सेनेच्या युनियन कार्यालयात आणून तडजोड करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.
हे ही वाचा:
अवैध मदरसांवर सरकारच्या कारवाईला बोर्डचा पाठिंबा
काँग्रेसने आपला अजेंडा आणि झेंडा मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला
कुणाल कामराला पुन्हा खुमखुमी, नवे गाणे केले पोस्ट
चेपॉकनंतर धोनीच्या हृदयात वानखेडेचे खास स्थान
याप्रकरणी कंत्राटदार विजय मोरे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीची तक्रार दाखल केली.
आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून कामगार सेना चिटणीस सुजय ठोंबरे याच्यासह ६ जणांना मंगळवारी अटक केली आहे.