उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या केसमध्ये सचिन वाझे याला ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणामध्ये १६ फेब्रुवारी रोजी सचिन वाझे सोबत दिसलेल्या एका महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील मिस्ट्री वुमन देखील आता एनआयएच्या ताब्यात आली आहे.
अँटिलिया समोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. एनआयएने या महिलेला गुरूवारी ताब्यात घेतले. एनआयएने स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात दक्षिण मुंबईतील एका हॉटेल आणि क्लबचा तपास केला. त्याशिवाय ठाणे येथील एका फ्लॅटमध्ये सर्च ऑपरेशन देखील केले, आणि नंतर या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा:
बंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू
आता जम्मू-काश्मीरमध्येही ‘गोविंदा-गोविंदा’
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला सचिन वाझेची निकटवर्तीय मानली जात होती. तिला ताब्यात घेण्यापूर्वी या महिलेची चौकशी देखील करण्यात आली. ही महिला सचिन वाझेसोबत हॉटेलमध्येही दिसली होती. १६ फेब्रुवारी रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. यावेळी सचिन वाझेकडे ५ मोठ्या बॅगा होत्या. या महिलेबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही, परंतू या ५ बॅगांमध्ये सचिन वाझे पैसे भरून नेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ही महिला सचिन वाझेचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम करत होती. ती दोन ओळखपत्रांचा वापर करून हे काम करत होती. तिच्याकडे सचिन वाझेच्या काळ्या मर्सिडिज गाडीत आढळलेले नोटा मोजण्याचे मशिनही होते.
मिळालेल्या माहितीनुसार मीरा रोड परिसरात एका फ्लॅटमध्ये ही महिला राहात होती. गेले २ आठवडे हा फ्लॅट बंद होता. अधिक चौकशीनंतर या महिलेला संध्याकाळी विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स मधील सी विंग ४०१ ही खोली मीना जॉर्ज या महिलेच्या नावाने ताब्यात घेण्यात आली होती. ही महिला सचिन वाझेची निकटवर्तीय असण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.