अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना बुधवार, ७ सप्टेंबर रोजी धारेवर धरले होते. भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले होते. या प्रकरणातील अमरावतीमधील संबंधित बेपत्ता मुलीचा शोध लागला आहे. ही मुलगी साताऱ्यात सापडली असून ही मुलगी सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे.
अमरावतीतील राजापेठ भागात एका हिंदू मुलीचे काल अपहरण करण्यात आले होते. मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात हजर केले होते. मात्र, संबंधित मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवण्यात आल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना कॉल केला असता त्यांनी राणा यांचा कॉल रेकॉर्ड केला यावरून नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.
त्यानंतर अमरावतीच्या पोलीसांनी काल रात्रीपासून मुलीचा तपास सुरु केला होता. ठिकठिकाणी नाकाबांदी करत पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. अखेर ही मुलगी सातारा येथे सापडली असून मुलगी सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे.
हे ही वाचा:
अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर
सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा
कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी
अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
“कार्यकर्ते साताऱ्यात पोहचत असून मुलगी सुरक्षित आहे. कुटुंबीयांना कुणी समोर आणू नये. ही राजकारण करण्याची वेळ नाही. मुलीची ओळख समोर आणू नये,” अशी विनंती शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.