भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये

भिवंडीतून १५ दिवसांपूर्वी एका सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते.

भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये

भिवंडीतून १५ दिवसांपूर्वी एका सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. ते अखेर झारखंडमधील नक्षलग्रस्त भागातून मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. हे बाळ सोमवारी त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी एका अपत्यहीन बाईसह तिघांना झारखंडमधून अटक करण्यात आली आहे.

१४ एप्रिल रोजी अरबाझ अन्सारीची आई शहाना हिला रमझाननिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात जायचे असल्याने तिने मुलाला त्याच्या मावशीकडे ठेवले होते. मात्र, अरबाझ रांगत रांगत घराबाहेर आला आणि गायब झाला. आजूबाजूला शोध घेऊनही अरबाझ न सापडल्याने अखेर त्याची मावशी आणि अरबाझच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर नारोली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अरबाझच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी त्याची मावशी राहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रिकरण मिळवले. ‘तपासात आमच्या पोलिसांना अफरोझ शेख याच्यावर संशय आला,’ असे पोलिस उपायुक्त नवनाथ डवले यांनी सांगितले.

शेख याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सर्व कहाणी कथन केली. त्याच्या ओळखीच्या शंभू शाहू यांच्या सूचनेनुसार, हे मूल उचलल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर शंभूला कल्याण रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले. ‘शंभूने ते मूल दोन लाख रुपयांना झारखंडमध्ये राहणाऱ्या मंजूदेवी शाहू या महिलेला विकल्याचे सांगितले,’ अशी माहिती इंदलकर यांनी दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेद्र महात्रे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने झारखंडमधील गिरिदीह जिल्ह्यातील जितकुंडी या नक्षलग्रस्त गावात पोहोचले आणि तेथून मुलाची सुटका केली. मंजूदेवीला अटक करण्यात आली असून तिला भिवंडीला आणणण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम’

केरळ स्टोरीवर सरकारकडून बंदीची मागणी वितरक मात्र पाठीशी

काली मातेच्या त्या फोटोवरून युक्रेनने टेकले गुडघे

लखनऊमध्ये गंभीर-विराट भांडण, दंडाची शिक्षा

मंजूदेवीचा १५ वर्षांपूर्वी विवाह झाला असून तिला अपत्य नाही. शंभू हा तिच्या गावातलाच असून तो भिवंडीत काम करतो. अरबाझचे अपहरण केल्यानंतर शेख याने त्याला शंभूकडे सोपवले. त्यानंतर भिवंडीला आलेल्या मंजूदेवीकडे अरबाझला देण्यात आले. त्यानंतर मंजूदेवी अरबाझला विमानाने घेऊन झारखंडला परतली.

Exit mobile version