बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिर परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका गाडीवर गोळीबार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोघांपैकी एकाने गोळीबार करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या गाडीमध्ये मीरा- भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी दीपक खंबित बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून दुचाकीसह पळ काढला. हे दुचाकीवरून गाडीचा पाठलाग करत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलीस तसेच कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिस उपायुक्त दाखल झाले होते.
हे ही वाचा:
काय घडलं अमित शहा-अमरिंदर सिंग भेटीत?
‘ही’ भागीदारी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात क्रांती आणेल
‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करावी’…काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’
परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गोळीबार करणारे दोघे काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आले होते. बांधकामाच्या वादातून हा हल्ला झाला आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंदिरापासून काही अंतरावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे जुने घर आहे.