पाकिस्तानच्या अल्पसंख्यांक हिंदूंच्या एका परिवारातील पाच लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या परिवारातील पाच जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू आणि शिख समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा:
रहीम यार खान शहरापासून १५ किमी लांब असणाऱ्या अबु धाबी कॉलनी नावाच्या ठिकाणी ही घटना घडली. या परिवारातील सर्व सदस्यांना कोणत्यातरी धारदार हत्याराने ठार मारण्यात आले असल्याचा संशय आहे. पोलिसांना या घरातून चाकू आणि कुऱ्हाड हस्तगत केले आहेत. या हत्यारांनी परिावारातील लोकांची हत्या करण्यात आली असावी असाही संशय आहे.
रहीम यार खान या शहरातील सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांनी दिलेल्या माहिती नुसार ३५-३६ वर्षीय मयत चंद मेघावल हे हिंदू होते. ते व्यवसायाने शिंपी होते आणि त्यांचे या भागात एक दुकान होते. बिरबल दास यांच्या मते, ही घटना सर्वांसाठी धक्कादायक आहे. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंदू परिवाराच्या निर्घृण हत्येनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. पाकिस्तानातील पंजाबचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी याबाबत माहिती घेऊन पोलिसांना लवकरात लवकर दोषींना अटक करण्याचे आदेश दिले आहे. मात्र पाकिस्तानात अल्पसंख्यांक समुदायावर केले जाणारे हल्ले ही सामान्य बाब झाली आहे. अनेकदा या समाजातील मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर देखील घडवून आणले जाते. काही काळापूर्वीच सिंध प्रांतातील एका मुलीचे एका पोलिसाने अपहरण करून तिचे धर्मांतर घडवून, तिच्याशी लग्न केल्याची घटना घडली होती.