‘बीबीसीची करचुकवेगिरीची कबुली म्हणजे भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा’

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा दावा

‘बीबीसीची करचुकवेगिरीची कबुली म्हणजे भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा’

‘बीबीसीने भारतात आपल्या दायित्वापेक्षा कमी कर भरल्याची कबुली दिली असल्याचा खुलासा प्राप्तीकर विभागाने केला आहे. बीबीसीनेही ते कर अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहेत, असे स्पष्ट केले आहे. मात्र ही करचुकवेगिरीची कबुली म्हणजे त्यांचा भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा असल्याचा दावा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केला आहे.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी भारतातील बीबीसीच्या कार्यालयांवर छापे घातल्यानंतर बीबीसीने स्पष्टीकरण दिले आहे. “बीबीसी भारतीय कर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. तसेच, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. अजून ही चौकशी पूर्ण झाली नसली तरी बीबीसी अर्थातच, आपल्या करविषयक जबाबदाऱ्या अतिशय गांभीर्याने घेते,’ असे बीबीसीच्या अधिकृत प्रवक्त्याने लंडनमध्ये स्पष्ट केले. बीबीसीवर भारत सरकार आणि भाजपकडून टीका होत आहे. प्राप्तीकर चुकवल्याची कबुली बीबीसीने दिल्यावर भाजपने विरोधकांवर तीव्र हल्ला केला आहे.

सन २००२च्या गुजरात दंगलीवरील माहितीपट प्रसारित करणार्‍या बीबीसीवर भाजपने टीका केली होती. बीबीसीच्या कबुलीजबाबानंतर पुरी यांनी बीबीसीच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मागील कृतींमुळे हे स्पष्टच होत आहे की, ते भारतविरोधी अजेंडा राबवणाऱ्या लोकांसोबत होते, असे वक्तव्य पुरी यांनी केले आहे.

हे ही वाचा:

उत्तर काशीत लव्ह जिहादच्या संशयावरून मुस्लिमांची दुकाने बंद करण्याची मागणी

‘वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब, टिपू सुलतनाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग नाही’

बीबीसीकडून ४० कोटींच्या कर चुकवेगिरीची कबुली

मॉन्सूनचे आगमन १६ जूननंतर होणार!

‘आमच्याकडे असे लोक आहेत जे हेरगिरी आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य यात फरक करू शकत नाहीत. आमचे कायदे पूर्णपणे पारदर्शक आहेत आणि जर तुम्हाला कर भरावयाचा आहे, तर त्याचे स्लॅब पूर्णपणे स्पष्ट आहेत. जेव्हा कर टाळणाऱ्यांना नोटीस बजावली जाते तेव्हा ते आरडाओरडा करतात,’ असे हरदीप सिंग पुरी म्हणाले.  

बीबीसीविरुद्ध प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईला लोकशाहीवरील हल्ला असे संबोधणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. पुरी म्हणाले की, देशातील काही ‘बुद्धिजीवी आणि दिशाभूल करणारे लोक’ वस्तुस्थिती जाणून न घेता सरकारचा निषेध करू लागतात. मात्र भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नाही तर एक मजबूत लोकशाहीदेखील आहे. जरी कोणाची इच्छा असली तरी, देशातील लोकशाही कोणीही नष्ट करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version