भायखळा परिसरात बाबू गेनू नगरातील हेरंब दर्शन या इमारतीत घरात घुसून एका माथेफिरूने दोन चिमुकल्यांवर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी दिली आहे.
माथेफिरूने घरात घुसून चाकूच्या धारेवर मुलांना वेठीस धरलं होतं. या चाकू हल्ल्यात दोन्ही मुले जखमी झाल्याची माहिती मिळाली असून दोन्ही लहानग्यांवर भायखळ्यातील मसिना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलांना जखमी केल्यानंतर माथेफिरूने स्वतःवर देखील चाकूने वार करून घेतले आहेत.
भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपीला घटनास्थळाहून ताब्यात घेतले असून दोन्ही चिमुकल्यांची सुखरूप सुटका केली आहे. आरोपीचे नाव लेबांत पटेल (वय ३०) असे असून तो तीन दिवसांपूर्वीच ओरिसातील चिंदगोडा येथून मुंबईत आला होता. तो गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटी परिसरात राहत होता.
हे ही वाचा:
महाराष्ट्र बंद मागे; पवारांच्या ट्विटने ठाकरेंची हवाच काढली !
रशियाच्या तुरुंगावर ISIS च्या दहशतवाद्यांचा ताबा !
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही! म्हणत शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
अनिल अंबानींवर सेबीची कारवाई; पाच वर्षांसाठी बंदी, ठोठावला २५ कोटींचा दंड
आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घोडपदेव येथील मराठा कंपाउंड येथे पटेल हा घुसला होता. मात्र, त्याच्या वेड्यावाकड्या चाळ्यांमुळे त्याला कंपाउंडमधील रहिवाशांनी हटकले. त्यानंतर तो घरांच्या कौलांवर जाऊन शर्ट काढून वेडसरपणा करू लागल्याने जमलेल्या नागरिकांच्या गर्दीने त्याला पुन्हा हटकले असता पटेल कौलांवरून पळत हेरंब दर्शन या इमारतीच्या तळमजल्यावर घुसला. तळमजल्यावर एकच घर आहे. येथे ट्युशनसाठी भाऊ बहीण आले होते. इतर मुलं देखील येणार होती. मात्र, त्यादरम्यान माथेफिरू पटेलने घरात घुसून स्वयंपाक घरातील चाकू घेतला. त्यावर ट्युशन घेणारी महिला आणि १० वर्षाची मुलगी घराबाहेर धावत आले. त्यावेळी त्याने मुलीच्या मानेवर किरकोळ वार केला. नंतर ९ वर्षाच्या मुलगा घरात असताना त्याने आतून घराला कडी लावून मुलावर चाकूने वार केले.
दरम्यान त्याने गॅस देखील सुरु केल्याचे पोलिसांना दिसून आले. याबाबत भायखळा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी खिडकीतून घरात प्रवेश करून मुलाची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून सुखरूप आहे.