ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजू मुरूडकर यांना गुरूवारी अटक करण्यात आली. पोलीसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथका कडून त्यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पोलीसांनी विशेष असा सापळा रचून डॉ.राजू यांना नवी मुंबईत अटक केली.
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. एकीकडे रूग्णांची संख्या भरमसाठ वाढत आहे तर दुसरीकडे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर यांचा तुतवडा भासत आहे. पण अशा कठीण परिस्थितीतही भ्रष्टाचारी प्रवृत्ती मात्र तशाच फोफावताना दिसत आहेत. गुरूवारी याचाच प्रत्यय ठाण्यात आला.
हे ही वाचा:
कोवीडच्या गंभीर बैठकीत उद्धव ठाकरेंचे इकडे-तिकडे
…तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?
हर हर महादेव! अयोध्येनंतर आता काशी विश्वेश्वराला मुक्ततेची आस
शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजू मुरूडकर यांना लाच घेताना पोलीसांनी अटक केली. महापालिकेला सध्या व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. या व्हेंटिलेटरची निविदा तक्रारदार शिवम भल्ला यांच्या इमीनोशॉप इंडिया प्रा. लि. या कंपनीला मिळवून देण्याचे मुरूडकर यांनी कबूल केले. त्या बदल्यात एकूण निवीदा रकमेच्या १०% म्हणजेच १५,००,००० रूपयांची मागणी मुरूडकर यांनी केली. ही रक्कम तीन हफ्त्यांमध्ये देण्यास सांगितले. यापैकी ५ लाखांचा पहिला हफ्ता देण्यासाठी मुरूडकर यांनी भल्ला यांना ऐरोलीतील लाईफ लाईन या त्यांच्या खासगी इस्पितळात बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी आधीपासूनच डाॅ.राजू मुरूडकर यांच्यासाठी सापळा रचला होता. गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी डाॅ.मुरूडकर पोलीसांच्या सापळ्यात अडकले. त्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.