पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. पुणे, दौंड, दिल्लीसह इतर ठिकाणी केलेल्या करवाईत तब्बल ४ हजार कोटी रुपये किंमतीचे २ हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली आहे. पुण्यातील या ड्रग्जच्या प्रकरणाची व्यप्ती आणखी मोठी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. पुढील तपासात पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. दरम्यान, पोलिसांनी पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या. पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून ५५ किलो ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारून ६०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले.
वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली होती. पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्स विक्री करायचे. ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने ड्रग्ससाठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता.
हे ही वाचा:
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी
७० वर्षांपूर्वीची अपुरी स्वप्ने मोदी पूर्ण करणार!
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
तीन दिवसांमध्ये चार हजार कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर धागेदोरे शोधण्यासाठी आणि आणखी ड्रग्जच्या मागावर पुणे पोलिस देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेले आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या सोमवार पेठेत केवळ २ किलो ड्रग्ज सापडलं होतं. त्यानंतर १९ फेब्रुवारीला विश्रांतवाडीत १०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज सापडलं. यासह दौंडमध्ये ५५० किलो ड्रग्ज सापडलं आहे. २० फेब्रुवारीला करकुंभ एमआयडीसीत ११०० कोटी रुपयांचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजीच पुणे पोलिसांनी दिल्लीत ८०० किलो ड्रग्ज जप्त केलं. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा पुणे पोलिसांनी दिल्लीतच १२०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. त्यामुळे तीन दिवसामध्ये तब्बल ४ हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. यात आंतरराष्ट्रीय धागेदोरे असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.