एका इस्लामिक मौलवीला १७ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मौलवीने पाच वर्षांपूर्वी १७ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते त्याच्या दुकानात पुरले होते.
मागील पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षाच्या मुलाची चौकशी सुरू असताना हे भयानक हत्याकांड समोर आले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी उत्तराखंडमध्ये लपून बसलेल्या मौलवीला ताब्यात घेतल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले. फॉरेन्सिक विभागाने ठाणे पोलिसाच्या मदतीने मृतदेह पुरला तेथून काही मानवी हाडे जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना नोव्हेंबर २०२० ची आहे. १७ वर्षीय बळीत शोएब शेखच्या कुटुंबाने स्थानिक पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. जवळजवळ ५ वर्षे उलटूनही पोलिसांना बेपत्ता मुलाबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते.
हे ही वाचा:
‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’
शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने माथाडी कामगाराने स्वतःवर गोळी झाडली
‘बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर आम्ही दंगली घडवल्या’
खाजगी आयुष्यावरील अफवा मानसिक आरोग्यावर परिणाम करतात
परंतु गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या सखोल तपासात बेपत्ता अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याचे उघड झाले.
भिवंडीतील नवी बस्ती येथे राहणारा मौलाना गुलाम रब्बानी शेख याने त्याच्या दुकानात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता, हे कृत्य बळीत शोएब शेखने बघितले होते.
अटकेच्या भीतीने, आरोपी मौलानाने शोएबला त्याच्या दुकानात बोलावले आणि त्याचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यातील काही तुकडे फेकून दिले आणि काही तुकडे त्याने नवीन बस्तीतील नेहरू नगर परिसरात असलेल्या त्याच्या दुकानाखाली पुरले.
पाच वर्षे उलटली तरी हरवलेल्या मुलाबद्दल कोणताही सुगावा लागला नाही, २०२३ मध्ये परिसरातील एका स्थानिक रहिवाशाने त्यांच्या मुलाच्या हत्येत मौलानाची भूमिका असल्याचे कुटुंबाला कळवले, कुटुंब मदतीसाठी पोलिस ठाण्यात पोहोचले त्यानंतर पोलिसांनी मौलानाला चौकशीसाठी ताब्यात घेतले परंतु तो पोलिस ठाण्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता, व उत्तराखंड येथे लपून बसला होता.
तथापि, पोलिसांनी त्याचा माग काढला आणि आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान, मौलानाने त्याचा गुन्हा कबूल केला आणि लैंगिक अत्याचार बघितल्यावर त्याने शोएबची हत्या कशी केली याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आरोपीच्या दुकानाखाली काही नमुने जप्त केले आणि ते तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहे.