‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक

‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक

सुली डील्स ऍप प्रकरणातील मास्टरमाइंडला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ओंकारेश्वर ठाकूर असे या आरोपीचे नाव असून हा सुली डील्स ऍपचा निर्माता आणि मास्टरमाइंड आहे. मुस्लीम महिलांना ट्रोल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ट्विटरवरील ग्रुपचा हा सदस्य होता. ओंकारेश्वर ठाकूर याला मध्य प्रदेशमधील इंदूर येथून अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सुली डील्स ऍपचा निर्माता ओंकारेश्वर ठाकूर याला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी ओंकारेश्वर ठाकूर हा इंदूर येथील न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा रहिवासी असून त्याने इंदूरमधील आयपीएस अकादमी या मोठ्या संस्थेतून बीसीए केले आहे.

प्राथमिक चौकशीदरम्यान, ओंकारेश्वर याने कबूल केले होते की, तो ट्विटरवरील ट्रेड- ग्रुपचा सदस्य होता आणि विशिष्ट धर्माच्या महिलांना बदनाम करण्याचा तसेच ट्रोल करण्याचा त्याचा हेतू होता. यासाठी त्यांनी गिटहबवर एक कोड डेव्हलप केला आणि ज्याचा एक्सेस गीटहबच्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना होता. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरही ऍपची लिंक शेअर केली होती. मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ग्रुपमधील सदस्यांनी महिलांचे फोटो अपलोड केले होते.

हे ही वाचा:

काय आहे SPG सुरक्षा कवच?

रतन टाटांचा जीवनप्रवास लवकरच वाचकांच्या भेटीला

उपाहारगृहे, हॉटेल्स, नाट्यगृहे, मॉल यांच्यावर आता हे नवे निर्बंध

… म्हणून पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द

‘सुली डील्स’ हे ऍप गेल्या वर्षात जुलै महिन्यात समोर आले होते. या ऍपवर मुस्लीम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगी शिवाय वापरण्यात आले होते. तसेच लिलाव करण्यासाठी या फोटोंचा वापर करण्यात आला होता. सहा महिन्यानंतर असाच एक प्रकार समोर आला. ‘बुली बाई’ विषयी एका महिला पत्रकाराने तक्रार केली होती. त्यानंतर कारवाई करत बुली बाई प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली.

Exit mobile version