अखेर आसाममध्ये सापडला बुल्ली बाई ऍपचा मास्टरमाईंड

अखेर आसाममध्ये सापडला बुल्ली बाई ऍपचा मास्टरमाईंड

दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन युनिटने बुल्ली बाई ऍप प्रकरणातल्या मुख्य आरोपीला आसाममधून अटक केली आहे. नीरज बिष्णोई असे या व्यक्तीचे नाव असून तो आसामचा रहिवासी आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणाचा शोध पूर्ण झाला आहे.

या ऍपसंदर्भात तक्रार करणाऱ्या महिलेने आपले छायाचित्र @bullibai_ या ट्विटरवरून अपलोड करून ते ऍपवर टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याआधारावर एफआयआर ०१/२२ दाखल करण्यात आला.

गिटहब नावाच्या सोशल मीडिया मंचावरून हे ऍप चालविण्यात येत होते. आता या सगळ्या प्रकरणानंतर ट्विटरने त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले असून गिटहबने हे ऍप बंद केले आहे. हे पूर्ण प्रकरण तांत्रिकदृष्ट्या किचकट असे होते. त्यामुळे अशा प्रकरणातील तज्ज्ञांची मदत घेऊन मुख्य आरोपी हा आसामच्या जोरहाट येथील असल्याचे निदर्शनास आले.

आयएफएसओचे एसीपी रमण लांबा यांच्या देखरेखीखाली हंसराज, विजेंदर, नीरज कुमार या अधिकाऱ्यांनी या आरोपीला जेरबंद करण्यासाठी तयारी केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. जोरहाट आसाम येथे आयएफएसओच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली त्यात नीरज बिष्णोईला ताब्यात घेण्यात आले. तेथील दिगंबर चूक, वॉर्ड नंबर २ येथे तो राहात होता.

त्याची चौकशी केल्यावर त्याने हे उघड केले की, त्यानेच गिटहबवर बुल्ली बाई ऍप तयार केले. त्यानेच @bullibai_ हे ट्विटर हँडल तयार केले. भोपाळमधील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून तो बी. टेक.चे शिक्षण घेत आहे. त्याने पुढे असेही सांगितले की, त्याने गिटहबचे अकाऊंट आणि ऍप नोव्हेंबर २०२१मध्ये तयार केले आणि डिसेंबरमध्ये ते अपडेट केले. त्याचेच ट्विटर अकाऊंट ३१ डिसेंबरला त्याने तयार केले. या ऍपसंदर्भात ट्विट करण्यासाठी आपण आणखी एक @sage0x1 नावाचे ट्विटर अकाऊंट उघडणार होतो.

हे ही वाचा:

तलवारीने केक कापणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

…आणि रायगडावरील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

लहान मुलांच्या ममींचे काय आहे रहस्य?

मोदी अडथळा बनलेत…

 

सोशल मीडियावर यासंदर्भात कोणत्या बातम्या येत आहेत, त्यावरही तो लक्ष ठेवून होता. त्यानेच @giyu44 नावाने ट्विटर अकाऊंट उघडले होते आणि त्यानेच म्हटले की, तुम्ही चुकीच्या माणसाला अटक केली आहे.

आता या प्रकरणाची पुढील चौकशी व तपास सुरू आहे.

 

Exit mobile version