अवघ्या सात महिन्यांच्या संसारात संशयाच्या भुताने प्रवेश केला अन संसार सुरू होण्यापूर्वीच संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गोरेगाव पश्चिम येथे राहणाऱ्या या दाम्पत्यापैकी पत्नी पूनम पाल हीचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील हॉटेलमध्ये माथेरान पोलिसांना सापडला. या गुन्ह्याची उकल करण्यात आली त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पूनम पाल आणि वरुण पाल हे नवदाम्पत्य होते. सात महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. ११ डिसेंबर रोजी पूनम हिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील थंडगार ठिकणासाठी प्रसिद्ध असलेले माथेरान येथील एका छोट्या हॉटेलच्या खोलीत स्थानिक पोलिसांना आढळून आला होता. पूनम हिचे शीर धडावेगळे करण्यात आले होते, पोलिसांना खोलीत कुठलेही सामान मिळून न आल्यामुळे मृतदेहाची ओळख पटली नव्हती, या दोघांनी हॉटेलमध्ये येण्यापूर्वी खोटे नाव आणि पत्ता सांगून प्रवेश मिळवला होता.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन मुळे पटली ओळख
स्थानिक पोलिसांना मृतदेहाची ओळख पटेल असा कुठलाही पुरावा खोलीत मिळून आला नव्हता. पोलिसांनी हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर तपासला असता त्या ठिकाणी पोलीसाना एक बॅग मिळून आली. त्या बॅगेत कापड्याशिवाय डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन मिळून आले होते. हे प्रिस्क्रिप्शन मुंबईतील गोरेगाव येथील डॉक्टरांचे होते. पोलिसांनी डॉक्टरांना संपर्क साधून चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली. गोरेगाव येथून पतीला भेटायला जाते, असे सांगून पूनम ही घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर तिचा आणि तिच्या पतीचा काही संपर्क झाला नसल्यामुळे गोरेगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.
स्थानिक पोलिसांना मिळून आले सीसीटीव्ही फुटेज
स्थानिक पोलिसांनी माथेरानमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पूनम ही पतीसोबत आल्याचे दिसून आले. पोलिसांनी फुटेजमधील इसमाचा शोध घेऊन त्याला पनवेलमधून अटक करण्यात आले. चौकशीत तो तिचा पती असून दोघांचे सात महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. दोन महिने दोघांचा संसार व्यवस्थित सुरू होता, मात्र त्यानंतर पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. यावरून दोघात वाद सुरू होते. मात्र संशयाचे भूत पतीच्या मानगुटीवर चांगलेच बसले होते.
हे ही वाचा:
सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला
एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आमचा उमेदवार गरीब होता; नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण
११ डिसेंबर रोजी पती पूनमला फिरण्यासाठी माथेरान या ठिकाणी घेऊन आला होता, त्या ठिकाणी त्यांनी एक खोली घेतली होती. त्याच खोलीत दोघाचे संबंध झाले आणि त्याच अवस्थेत दोघात वाद झाले आणि त्याने विवस्त्र अवस्थेत असणाऱ्या पत्नीच्या गळ्यावर सोबत आणलेल्या चाकूने वार करून तिची हत्या केली आणि खोलीत कुठलाही पुरावा न ठेवताच त्याने खोली सोडली अशी माहिती त्याच्या चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.