अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ही कंपनी उत्पादित करत असलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक आणि पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.
‘जॅान्सन बेबी पावडर’चा वापर हा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे या उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नसल्याने त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा ‘जॅान्सन बेबी पावडर’ या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक
चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी
बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात
मुंबई शासकीय विश्लेषक आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा यांनी नमुने राष्ट्रीय मानकांनुसार अयोग्य असल्याचा निष्कर्ष नोंदवून अप्रमाणित घोषित केले होते. कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. तसेच कंपनीला उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अहवाल मान्य नसल्याचे सांगून कंपनीने केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता. केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून ही फेरचाचणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेने या नमुन्यांची चाचणी अप्रमाणित घोषित केली. कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेचा अहवाल हा निर्णायक पुरावा असल्यामुळे, अनुज्ञप्तीधारकाने उत्पादित केलेले संबंधित उत्पादन हे अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले आहे.