मणिपूर: मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील मोबाईल हस्तगत

पुढील तपासासाठी फोन सायबर सेलकडे पाठवण्यात आला

मणिपूर: मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील मोबाईल हस्तगत

मणिपूरमध्ये ४ मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर देशभरात सर्वच स्तरावरून निषेध नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी आता मणिपूर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे कारवाई दरम्यान एका आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या फोनचा वापर घटनेचा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर अत्याचाराच्या प्रकरणात एक फोन जप्त करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी सायबर सेलकडे पाठवण्यात आला आहे. याच फोनवरून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या घटनेत सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींची चौकशी केली जात आहे.

कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली होती. या घटनेचा व्हिडिओ दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर व्हायरल झाला. यानंतर याची दखल पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आली. त्यानंतर २० जुलै रोजी पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली. आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा:

इराणकडून स्वीडन आणि डेन्मार्कमधील उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

सात्विक-चिरागला वर्षातील तिसरे विजेतेपद !

न्यायाधीशांचा कुत्रा हरवला; सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित करा!

सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात उसळून येत आहे. तसेच ४ मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आलेल्या घटनेमागे देखील अफवाच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला मृत फोटो समोर आल्यानंत चुरचंदपूर येथील आदिवासींकडून पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करण्यात आला. मात्र, हा फोटो दिल्लीतील एका घटनेचा होता हे कालांतराने स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत चुरचंदपूर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Exit mobile version