मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक

न्यायालयाने सुनावली सीबीआय कोठडी

मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक

मणिपूरमधील हिंसाचार अधूनमधून डोकावत असताना हा हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. या हिंसाचारादरम्यान सप्टेंबर महिन्यात मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांची हत्या झाली होती. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला होता. या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणात सीबीआयकडून गेल्या काही दिवसांपासून तपास सुरू होता. या प्रकरणातील आरोपींनी मणिपूरमधील १७ वर्षीय विद्यार्थी हिजाम लिनथोइंगंबी आणि २० वर्षीय फिजाम हेमजीत यांचे अपहरण केले होते. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी त्यांची हत्या झाल्याचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर चार आरोपींना अटक केली होती. पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकिप आणि दोन महिला लिंग्नेइचोन बैतेकुकी आणि टिननेइलिंग हेन्थांग अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. परंतु, या प्रकरणातील मास्टरमाइंड फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

सीबीआयच्या तपासाला यश आले असून या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. पुणे येथे येऊन त्या व्यक्तीला सीबीआयने अटक केली. २२ वर्षीय पाओलुनमांग याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १६ ऑक्टोबरपर्यंत सीबीआयची कोठडी दिली आहे. मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्याकांड प्रकरणाचा त्याचावर आरोप आहे.

हे ही वाचा:

गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना

डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!

पुढच्या निवडणुकांआधीच निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

मणिपूरमधून जुलै महिन्यात दोन विद्यार्थी बेपत्ता झाले होते नंतर या विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाली आणि त्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले. या फोटोंमध्ये शस्त्रधारी व्यक्तीही दिसत होत्या. ज्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत ते दोन्ही विद्यार्थी मैतेई समुदायाचे होते.

Exit mobile version