बिहारमधील एका व्यक्तीने तब्बल ११ वेळा कोरोना प्रतिबंधित लस घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिहारमधील मधेपूर जिल्ह्यातील ब्रह्मदेव मंडल याने आधार कार्ड आणि मतदार कार्डच्या मदतीने तब्बल ११ वेळा लस घेतली. मंडल हा बाराव्यांदा लस घ्यायला गेला असता त्याला ताब्यात घेण्यात आले.
मधेपूर मधील ब्रह्मदेव मंडल या ८४ वर्षीय व्यक्तीने ११ वेळा कोरोना प्रतिबंधित लसीचा डोस घेतला. प्रत्येकवेळी लस घेतल्यावर पाठीचे दुखणे बरे होत असून आरामदायी वाटत असल्याचे याने चौकशीदरम्यान सांगितले.
जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय कृष्ण प्रसाद यांच्या तक्रारीनुसार मंडल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या वयाचा विचार करता त्याला जामीन मिळू शकतो. बाराव्यांदा लस घेण्यासाठी मंडल लसीकरण केंद्रावर पोहचला असता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.
हे ही वाचा:
नाट्यसंगीत गायक पंडित रामदास कामत यांचे निधन
‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
या व्यक्तीकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसून केवळ कागदावर नोंदी केल्या आहेत. लस घेतल्यावर दुखणी कमी होतात, थंडी वाजत नाही अशी कारणे मंडल याने दिली. लस प्रमाणपत्र नसल्यामुळे आता आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मंडल हा खरे बोलत आहे की खोटे याची पडताळणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.