देशात अनेक चोरींच्या घटना घडत असतात. यामध्ये अशाही घटना समोर येतात, जे चोरी केलेल्या वस्तू चोर पुन्हा परत करतो. मात्र, असे क्वचितच घडते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधून समोर आली आहे. मंदिरातून चोरी केलेली मूर्ती चोराने परत केल्याचे समोर आले आहे. तसेच याबाबत चोराने माफी देखील मागितली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या नवाबगंज येथील राम जानकी मंदिरातून २३ सप्टेंबर रोजी १०० वर्षे जुनी अष्टधातूची मूर्ती चोरीला गेली होती. या घटनेची माहिती मंदिर प्रशासनाने पोलिसांना दिली. या चोरीमुळे मंदिराच्या पुजाऱ्यांनी बेमुदत उपोषण देखील सुरु केले होते. त्यानंतर तपास सुरु केला. परंतु, चोरीची तक्रार झाल्यानंतर १० दिवसांनी, राष्ट्रीय महामार्गाच्या गौघाट लिंक रोडवर वाटसरूंना एका गोणीत चोरी झालेल्या मूर्ती सापडल्या. मूर्तीसोबत एक पत्रही होते, ज्यामध्ये माफीचा उल्लेख होता आणि ते चोराने लिहिल्याचे समजते.
हे ही वाचा :
वजन कमी करण्यासाठी खेळाडू इतर कोणाला दोष देऊ शकत नाहीत!
पित्याच्या नात्याला काळीमा; पोटच्या मुलीवर अत्याचार!
कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद
अमितभाई कल किसने देखा? आताच निर्णय घ्या…
माफीनामा पत्रात चोर म्हणाला, महाराज जी (पुजारी), माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. माझ्या अज्ञानामुळे मी गौघाटातून राधाकृष्णाची मूर्ती चोरली. मात्र, तेव्हापासून मला वाईट स्वप्न पडत आहेत, माझी आणि माझ्या मुलाची तब्येतही बिघडली आहे. मला क्षमा करा आणि आपली मूर्ती स्वीकारा, असे पत्रात म्हटले आहे. मूर्ती मिळाल्यानंतर पुजाऱ्यांनी पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली. दरम्यान, चोरट्याची ओळख, त्याचा ठावठिकाणा याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस मूर्ती चोरणाऱ्याचा शोध घेत आहेत.