मानेत खुपसलेला चाकू घेऊनच तो रुग्णालयात पोहोचला

एमपीसीटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तेजसने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.

मानेत खुपसलेला चाकू घेऊनच तो रुग्णालयात पोहोचला

३ जून रोजी झोपेत असताना सानपाडा येथील एका ३० वर्षीय व्यापाऱ्यावर त्याच्या भावानेच चाकूने वार केला. या भावाने गंजलेला चाकू त्याच्या मानेत खुपसला होता. मात्र क्षणाचाही वेळ न दवडता हा तरुण मोटारसायकलवरून एक किमी अंतरावरच्या रुग्णालयात पोहोचला. या हल्ल्यातून हा तरुण आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.

थोड्या शारीरिक इजेव्यतिरिक्त त्याला काहीही झालेले नाही. या युवकाचे नाव तेजस पाटील. तेजसच्या मानेतील चाकू काढण्यासाठी आणि खराब झालेल्या रक्तवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी त्याच्यावर एमपीसीटी रुग्णालयामध्ये चार तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला सोमवारी सर्वसामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या अनेक प्रमुख रक्तवाहिन्यांना इजा न झाल्याने तेजस बचावला. शनिवारी कौटुंबिक वादातून मोनिष या २८ वर्षीय तरुणाने त्याचा भाऊ तेजस पाटील याच्या गळ्यावर वार केले होते.

“मोनिषने मला मारण्याचा प्रयत्न केला, या धक्क्यातून मी अद्याप सावरलेलो नाही,’ असे तेजस म्हणाला. मोनिषला मद्यपानाचे व्यसन आहे. हल्ला झाला तेव्हा तो मित्रासोबत होता. त्यांनी यापूर्वी मोनिषला त्यांच्या पाणी टँकर पुरवठ्याच्या व्यवसायात भागीदार केले होते, परंतु त्याच्या वाईट संगतीमुळे तो गांभीर्याने काम करत नसे, असे तेजस म्हणाला. या प्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोराचा शोध सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसोबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पाहिला ‘द केरळ स्टोरी’

विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह

एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?

राज्यातील निवडणुका भाजपा-शिवसेना एकत्र लढणार

एमपीसीटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तेजसने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. तेजसने त्याचे सासरे भूपेंद्र सिंह यांनाही फोन करून वार झाल्याची माहिती दिली. तेजसची पत्नी उलवे येथील माहेरी गर्भधारणासंबंधी तपासणीसाठी गेली होती. “तेजस आत येताच आम्ही मान, मेंदू आणि छातीचे सीटी स्कॅन केले. चाकू मानेमध्ये खुपसला गेला होता. त्यामुळे प्लास्टिक सर्जन, न्यूरोसर्जन, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट आणि हृदय शल्यचिकित्सक यांची एक टीम ताबडतोब बोलावण्यात आली. धमन्या आणि मज्जातंतूंना इजा होऊ न देता चाकू काढण्यात आला. धमन्या किंवा मज्जातंतूंना इजा झाली असती, तर त्याला कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू होण्याचा धोका होता, ’ अशी माहिती एमपीसीटी हॉस्पिटलचे डॉ. प्रिन्स सुराणा यांनी दिली.

तब्बल चार तास ही शस्त्रक्रिया पार पाडली. सामान्य वॉर्डात हलवण्यापूर्वी तेजसला एक दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीला आता धोका नसून दोन दिवसांनी त्याला घरी सोडले जाणार आहे. तेजस यांचा रविवारी रुग्णालयात जबाब नोंदवण्यात आला असून त्यांनी आरोपीची नावे सांगितली आहेत. रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, तपास सुरू असल्याचे सानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापूराव देशमुख यांनी सांगितले.

Exit mobile version