भारतीय बँकांचे करोडो रुपये घेऊन परदेशात पळालेल्या विजय, मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून केंद्र सरकारने मोठी वसुली केली आहे. तीन फरार आरोपींकडून सरकारने आतापर्यंत १९,१११.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापैकी १५,११३.९१ कोटी रुपयांची मालमत्ता ज्या बँकांचे पैसे घेऊन ते पळून गेले त्यांना परत करण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजलाल यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही संपूर्ण माहिती दिली आहे. बँकांचे कर्ज न फेडता परदेशात पळून गेलेल्या व्यावसायिकांची मालमत्ता जप्त करून बँकांना पैसे परत करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे का, असा प्रश्न पंकज चौधरी यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री म्हणाले की, ‘ १५ मार्च २०२२ पर्यंत, तीन फरारी लोकांची एकूण १९,१११.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यापैकी १५,११३.९१ कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देण्यात आली आहे. सुमारे ३३५.०६ कोटी रुपयांची मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत.
हे ही वाचा:
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा
हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले
…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य
प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा; अटकेपासून संरक्षण
दरम्यान, विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे तर मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी अँटिग्वाचे नागरिकत्व घेऊन तिथे राहत आहेत. भारत सरकारने त्यांच्याविरुद्ध परदेशी न्यायालयात खटलेही दाखल केले आहेत. विजय मल्ल्यावर मुद्दल आणि व्याजासह नऊ हजार कोटीं रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. तर पंजाब नॅशनल बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि चोक्सी यांनी बँकांचे तब्बल तेरा हजार कोटी रुपयांचे नुकसान केले आहे.