मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती

मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिकच्या मालेगावमधून कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झाल्याची बाब समोर आली होती. मालेगावमधील बँकेत बेनामी हवालाद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये आले आणि नंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेल्याचे उघड झाले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. मुंबईतील सहा बँकांमधून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद, मोहम्मद भगद आणि इतर बेनामी खात्यांमध्ये पैसे आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील बँक ऑफ बरोदा, इंदुसिंद बँक, करुर वैश्य बँक, कॅनरा बँक या बँकांमधून मालेगावच्या बँकेत हे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. हा व्यवहार रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंटच्या (RTGS) माध्यमातून झाला आहे.

या प्रकरणात नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक रविंद्र दत्तात्रय कानडे आणि सहव्यवस्थापक दिपरत्न साईदास निकम यांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान यापूर्वी मालेगाव व्होट जिहाद फंडिंग स्कॅम प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद याच्याशी संबंधित २४ हून अधिक ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. ईडीकडून ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू होती. आरोपी सिराज मोहम्मदचे २४ बेनामी बँक अकाऊंट मालेगावच्या नाशिक मर्चंट बँक आणि महाराष्ट्र बँकेत सापडले होते.

दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने शेल कंपन्यांच्या २१ बँक खात्यांमधून डेबिट आणि क्रेडिट व्यवहारांद्वारे ८०० कोटी रुपयांचा मनी ट्रेल ओळखला आहे. नवी मुंबई, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे असलेल्या या कंपन्या अल्पावधीत स्थापन झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. हा गैरव्यवहार १२० कोटी नव्हे तर १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. २१ बनावट कंपन्यांच्या बँक खात्यातून ८०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून गैरव्यवहाराची नवी मुंबई, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्लीपर्यंत व्याप्ती असल्याची धक्कादायक माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.

हे ही वाचा: 

पोलिसांशी झालेल्या चकमकीत खलिस्तान कमांडो फोर्स संघटनेचे तीन दहशतवादी ठार

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक

ठाकरेंच्या अटी-शर्थींवर शिक्कामोर्तब… मात्र, जिंकले अदाणी

पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या काश्मिरी दहशतवाद्याला बंगालमध्ये अटक!

नाशिक मधील मालेगाव येथील बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून १२५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे ‘व्होट जिहाद’साठी वापरल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी तक्रार देत त्यांनी चौकशीची मागणी केली होती.

Exit mobile version