राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मालेगावमधून कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झाल्याची बाब समोर आली होती. मालेगावमधील बँकेत बेनामी हवालाद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये आले आणि नंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेल्याची बाब समोर आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि अक्रम मोहम्मद या दोघांना अटक झाली होती.
यानंतर या प्रकरणात आता नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक रविंद्र दत्तात्रय कानडे आणि सहव्यवस्थापक दिपरत्न साईदास निकम यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दरम्यान यापूर्वी मालेगाव व्होट जिहाद फंडिंग स्कॅम प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद याच्याशी संबंधित २४ हून अधिक ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. ईडीकडून ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू होती. आरोपी सिराज मोहम्मदचे २४ बेनामी बँक अकाऊंट मालेगावच्या नाशिक मर्चंट बँक आणि महाराष्ट्र बँकेत सापडले होते.
मालेगाव व्होट जिहाद पैसा घोटाळा.
आत्ता
नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक रविंद्र दत्तात्रय कानडे व सहव्यवस्थापक दिपरत्न साईदास निकम यांची पोलिसांनी केली अटक
या पूर्वी सिराज मोहमद आणि अक्रम मोहमद यांची अटक झाली आहे @BJP4Maharashtra pic.twitter.com/IeuBd5AznF
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 3, 2024
दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने शेल कंपन्यांच्या २१ बँक खात्यांमधून डेबिट आणि क्रेडिट व्यवहारांद्वारे ८०० कोटी रुपयांचा मनी ट्रेल ओळखला आहे. नवी मुंबई, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे असलेल्या या कंपन्या अल्पावधीत स्थापन झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. हा गैरव्यवहार १२० कोटी नव्हे तर १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. २१ बनावट कंपन्यांच्या बँक खात्यातून ८०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून गैरव्यवहाराची नवी मुंबई, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्लीपर्यंत व्याप्ती असल्याची धक्कादायक माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल
मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार
पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावरून २०२५ मध्ये पुतीन करणार भारत दौरा!
नाशिक मधील मालेगाव येथील बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून १२५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे ‘व्होट जिहाद’साठी वापरल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी तक्रार देत त्यांनी चौकशीची मागणी केली होती.