मालवणीमध्ये गुरुवारी रामनवमी मिरवणुकीवेळी काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. ड्रोन आणि इतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तणाव निर्माण करणाऱ्या लोकांची ओळख पटवली जात आहे. या प्रकरणी अटकेची कारवाई केली जात असून २०० ते ३०० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी या गोंधळ घालणाऱ्यांची धरपकड केली आहे.
मुंबईतील मालाड परिसरात गुरुवारी रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली. मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात काल राम नवमीनिमित्तची शोभायात्रा आली असता अचानक काही गटांकडून दगडफेक झाली. मालवणी येथे दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. हाणामारी आणि लाठीमारात काही जण जखमी झाले.
मालवणी परिसरात शोभा यात्रेदरम्यान वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ३०० हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मालवणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ३५३ आणि इतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी सध्या मालवणी पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले आहे असे मुंबईचे पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात
पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात
संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले
रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा
मालवणी हिंसेप्रकरणी २० अधिक लोकांना आम्ही ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केलीय आणखी काही लोकांना आम्ही अटक करणार आहोत. या प्रकरणात बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे अश्या प्रकारच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.जे लोक या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत असे बन्सल यांनी सांगितले. रामनवमीच्या मिरवणुकीत काही अज्ञात लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे असेही पोलीस उपयुक्त बन्सल यांनी स्पष्ट केले.