न्यायालयाने सुनावल्यानंतर मोइत्रा यांच्या वकिलाची सुनावणीतून माघार

न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर शंकरनारायणन यांनी घेतली स्वतःहून माघार

न्यायालयाने सुनावल्यानंतर मोइत्रा यांच्या वकिलाची सुनावणीतून माघार

दिल्ली उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे वकील गोपाल शंकर नारायण यांना खडसावल्याने त्यांनी या सुनावणीतूनच माघार घेतली आहे. महुआ मोइत्रा यांचे वकील गोपाल शंकरनारायण यांनी मोइत्रा यांच्याविरुद्ध तक्रार करणारे वकील जय अनंत देहादराई यांच्याशी संपर्क साधून मोइत्रा यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून आम्ही भयचकित झालो, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली.

 

‘मी खरोखर भयचकीत झालो आहे. तुम्ही अशी व्यक्ती आहात, ज्यांच्याकडून सर्वोच्च व्यावसायिक मानके राखणे अपेक्षित आहे. तुम्ही प्रतिवादी क्रमांक २ (ऍड. जय अनंत देहादराई) यांच्या संपर्कात आहात,’ अशी टिप्पणी न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी केली. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि देहादराई आणि काही वृत्तमाध्यमांवर मोइत्रा यांनी दावा दाखल केला आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर शंकरनारायणन यांनी या प्रकरणातून स्वतःहून माघार घेतली.

 

संक्षिप्त सुनावणीदरम्यान देहादराई यांनी न्यायालयापुढे त्यांचे म्हणणे मांडले. ‘गोपाल शंकर नारायण यांनी त्यांच्याशी फोनवर सुमारे ३० मिनिटे चर्चा केली. तसेच. हेन्री या कुत्र्याच्या बदल्यात सीबीआयकडे केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले.’ त्यांच्या या संभाषणाचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे, असे सांगत देहादाराय यांनी शंकरनारायण यांनी सुनावणी करणे योग्य ठरणार नाही, हा औचित्याचा भंग आहे, अशी भूमिका मांडली.

 

तर, शंकरनारायणन यांनी देहादराई यांनी त्यांना पूर्वी तसे संकेत दिले होते, त्यानुसारच त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे स्पष्टीकरण दिले. “मी माझ्या अशिलाला सांगितले की, मी त्याच्याशी बोलेन आणि तिने होकार दिला,” असे देहादाराई यांनी स्पष्ट केले. शंकरनारायणन यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. ‘मी देहादराई यांना ओळखत असल्याने,  काल त्याच्याशी संपर्क साधला होता. तसेच, त्यांच्याशी हे प्रकरण मिटवण्यासंदर्भात बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी मी नंतर संपर्क साधेन असे सांगितले होते. मात्र त्यांनी तसे केले नाही,’ असे स्पष्टीकरण शंकरनारायण यांनी दिले.

 

हे ही वाचा:

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

महाराष्ट्राच्या सुवर्ण विजेत्याला आता एक कोटी!

‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’

भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

 

न्यायालयाने हे प्रकरण ३१ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे. मोइत्रा यांनी त्यांच्याविरुद्ध कोणेताही बनावट आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यासाठी मोइत्रा यांनी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत ही सुनावणी सुरू होती.

 

 

मोईत्रा यांनी सांगितले की, देहादराई हे आधी एक जवळचे मित्र होते. मात्र त्यांच्या नातेसंबंधांमध्ये कडवटपणा आला. त्यांनी तिला अभद्र, धमक्या देणारे, अश्लील संदेश पाठविणे सुरू केले, असे मोइत्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे. देहारादाई याने मोइत्रा यांच्या अधिकृत घरातही घुसखोरी केली आणि त्यांची काही वैयक्तिक मालमत्ताही चोरली, ज्यात पाळीव कुत्रा हेन्रीचाही समावेश होता. हा पाळीव कुत्रा नंतर परत करण्यात आला. या विरोधात मोइत्रा यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. हे प्रकरण संगनमताने मिटल्यानंतर त्या तक्रारी मागे घेण्यात आल्या, असे याचिकेत म्हटले आहे.

Exit mobile version