ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून तुरुंगावर पाळत ठेवणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीची अंमलबजावणी केली आहे. कारागृहांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. राज्यातल्या तुरुंगातील कैद्यांवर आता ड्रोनची कडक नजर असणार आहे.
महाराष्ट्रातील तुरुंगांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख करनयेत येणार आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा आणि कैद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ तुरुंगांमध्ये ड्रोन पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. तुरुंगाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ड्रोन टेहळणीला प्राधान्य देण्यात आले असल्याचे महाराष्ट्राच्या तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि तुरुंग आणि सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे.
राज्यातील कारागृहांसह कैद्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. याअंतर्गत आता ड्रोनद्वारेही हालचाली टिपण्यास प्राधान्य दिले जात आहे. सुरुवातीला ८ मध्यवर्ती ,२ जिल्हा कारागृह आणि २ खुल्या कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन देखरेख करण्यात येणार आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून तुरुंगावरदेखरेख ठेवणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये तुरुंग मुख्यालयाने लखनौ, आझमगड, चित्रकूट, बरेली आणि गौतम बुद्ध नगर येथील तुरुंगांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख सुरू केली होती. सर्व कारागृहांमध्ये एक नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला असून, तेथे लॅपटॉपद्वारे सर्व हालचालींवर सतत नजर ठेवली जाते.
कैद्यांवर अशी ठेवली जाणार नजर
महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार १२ ड्रोन वेगवेगळ्या कारागृहातील हालचालींची नोंद करणार आहेत. रात्रीच्या वेळी संबंधित ड्रोनद्वारे रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. विशेषतः कारागृहातील घडामोडी आणि कैद्यांची माहिती मिळण्यास मदत होईल.रात्रीच्या वेळी ही ड्रोन कार्यरत राहणार असून चांगल्या प्रकारची दृष्यता, बॅटरी वापर करण्यात येईल. एकावेळी ३५ मिनिटे शूटिंग ड्रोनने करता येणार आहे. पाच किलोमीटर पर्यंत उंच ड्रोन जाऊ शकतो आणि फोटो, व्हिडिओ घेऊ शकतो.
हे ही वाचा:
‘२००० कोटींचे डील’ सतावत राहणार!
प्रतीक्षा संपली … रौप्यमहोत्सव साजरा करताना ऍपल आले मुंबईत
प्रख्यात गायिका आशा भोसले यंदाच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी
भरमसाठ संख्या वाढल्यामुळे १ लाख माकडे श्रीलंकेतून निघाली चीनला
तुरुंगात प्रायोगिक तत्वावर अमलबजावणी
प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे , अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर याठिकाणी ड्रोन पाहणी सुरू करण्यात आली आहे.
७४ लाख रुपयांची सुरक्षा उपकरणे खरेदी करणार
राज्य शासनाने राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरण योजनेसाठी ड्रोन व एक्स-रे बॅग स्कॅनर सिस्टीम यासाठी एकूण तीन कोटी ७४ लाख रुपयांची सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.