महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले, ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल

महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले,  ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल

उंबरगाव येथील रहिवासी असलेले बिल्डर जितू पटेल यांची रत्नागिरी येथून सुरक्षित सुटका करण्यात सुरत पोलिसांना यश मिळाले. या कामी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेत तोंडभरून कौतूक केले.

वलसाडच्या उंबरगाव येथे बांधकाम व्यावसायिक जितू पटेल यांचे नाट्यमयरित्या अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याच फोनवरून फोन करून ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या अपहरण नाट्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गुजरातच्या विधानसभेत हा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर कथन करण्यात आला आणि त्याबरोबरच या कामात महाराष्ट्र पोलिसांचे देखील मोलाचे सहाय्य लाभले असे देखील या उत्तरात सांगण्यात आले.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा

भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही

गुजरातमध्ये लव्ह जिहादला वेसण

उंबरगाव (उमरगाम) येथील बांधकाम व्यावसायिक जितू पटेल यांचे दिनांक २२ मार्च २०२१ रोजी नाट्यमयरित्या अपहरण करण्यात आले होते. एक फॉर्च्युनर आणि एका होंडा सिटी गाडीतून चार माणसे उतरली आणि त्यांनी जितू पटेलना बंदुकीचा धाक दाखवून फिल्मी स्टाईल अपहरण केले. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या राजेश सिंह यांनी या बाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच्या आधारे पोलिसांनी २३ मार्च २०२१ रोजी एफआयआर नोंदवून घेतला.

यानंतर वलसाड पोलिस, सुरत क्राईम ब्रांच आणि गुजरात एटीएस यांनी तपासाला सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचे देखील सहकार्य घेतले. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी मुंबई ते सुरत या सुमारे ७००किमीच्या पट्ट्यातील एक हजारपेक्षा जास्त खासगी आणि सरकारी आस्थापनांवरील सीसीटीव्ही फुटेजेस पाहिली. त्याबरोबरच रस्ते आणि रेल्वे मार्गांवर कडक बंदोबस्त करण्यात आला.

जितू पटेल यांचे मित्र उद्योगपती प्रशांत कारूळकर यांनी मिरा-भायंदर, वसई-विरार विभागाचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संशयित अपहरणकर्ते या भागातील असण्याची शक्यता वर्तवून गुजरात पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य करण्याची विनंती केली. डीटेक्शन पोलिस इन्स्पेक्टर जितेंद्र वनकोटी यांना कारुळकर आणि त्यांचे वलसाडमधील मित्र राजू सुब्रमण्यम यांनी या घटनाक्रमाबाबत तपशीलवार माहीती दिली.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने दाते यांच्या आदेशानुसार एक टीम बनवली.

हे तपासकार्य चालू असतानाच २४ मार्च रोजी अपहरणकर्त्यांकडून जितू पटेल यांच्याच फोनचा वापर करून खंडणीसाठी फोन करण्यात आला. २९ मार्च रोजी सुरत येथील सीसीटीव्ही मधून हे दोन अपहरणकर्ते राजधानी एक्सप्रेसमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. राजधानी सुरतमधून सुटल्यानंतर तिचा पहिला थांबा बोरिवली आहे. त्यामुळे मीरा-भायंदर, वसई-विरार पोलिसांनी बोरिवली येथेच सापळा रचला.

सुरत येथून राजधानी एक्सप्रेस बोरिवलीला थांबत असल्यामुळे तिथे एका टीमने बारीक नजर ठेवली आणि तिथेच अपहरणकर्त्यांचे मजबूत धागेदोरे पोलिसांच्या हाती आले. एक संशयित पोलिसांच्या हाती आला. त्याची चांगली कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळेला या दोन इसमांनी जितू पटेल यांना रत्नागिरीच्या दुर्गम भागात ठेवले असल्याची माहिती दिली. त्यानंतर वलसाड पोलिस, सुरत सिटी पोलिस, सुरत क्राईम ब्रांच, गुजरात एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या एका टीमने या संशयितांनी सांगितलेल्या स्थळी धडक कारवाई केली.

अपहरणकर्त्यांकडे शस्त्रास्त्र असूनही पोलिसांनी धाडसाने कारवाई केली. या कारवाईत जितू पटेलला सुरक्षितरित्या वाचवण्यात आले. त्याबरोबरच या अपहरणामागे असलेल्या सात अपहरणकर्त्यांनादेखील यावेळी बेड्या ठोकण्यात आल्या. पप्पू चौधरी, दीपक उर्फ अरविंद यादव, अजमल हुसैन अन्सारी, अयाझ, मोबीन उर्फ टकल्या, इशाक मुंजावर आणि जितनेश कुमार उर्फ बबलू कुमार यांना अटक करण्यात आली. त्याबरोबरच १ पिस्तुल, २ मॅग्जिन, ८ फोन आणि काही सीमकार्ड रोकड रक्कम, गुन्ह्यात वापरलेल्या आणि दिल्लीहून चोरलेल्या होंडा आणि फॉर्च्युन गाड्या, नकली नंबर प्लेट, काही खोटी ओळखपत्रे जसे की काही आधारकार्ड वगैरे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या गुन्ह्याचे धागेदोरे पश्चिम बंगालपर्यंत जोडलेले आहेत. या गुन्ह्यातील प्रथम आरोपी पप्पू चौधरी हा बंगालमधील तुरूंगात असलेल्या चंदन सोनारचा उजवा हात मानला जातो. या सर्वांचे सोनारसोबत काहीना काही संबंध असल्याचे उघड झाले आहे. सोनार याच्या टोळीने आत्तापर्यंत देशात अनेक अपहरणे घडवून आणली आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड इत्यादी राज्यात या चंदन सोनारने अपहरणे घडवून आणली आहेत.

या घटनेमध्ये गुजरातचे डीजीपी, सुरत रेन्ज, वलसाड पोलिस, गुजरात एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांनी अभूतपूर्व कामगिरी केली असे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. त्याबरोबरच या कामात महाराष्ट्र पोलिसांचा मोलाचा वाटा राहिला होता.

Exit mobile version