सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!

मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात केली होती घोषणा

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला आहे. सातही आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून वाल्मिक कराड याच्यावर सध्या मोक्का लावण्यात आलेला नाही.

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असला तरी हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर अद्याप मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात या हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली. आता या सर्व आरोपींवर मोक्का लावला असल्याची माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा..

केरळमध्ये दलित मुलीचे तब्बल ६४ जणांनी केले शोषण

हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!

‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला

काय होईल ते होईल, आम्ही सगळ्या पालिका निवडणुका स्वबळावर लढू!

मोक्का हा अत्यंत कठोर कायदा असून संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. आरोपीवर एकदा मोक्का लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही. शिवाय मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो.

Exit mobile version