एका २४ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची घटना धारावीत समोर आली आहे. तिच्या पतीने तीला मारहाण करून फासावर लटकवल्याचा आरोप विवाहितेच्या वडिलांनी केला आहे. हिंदू असलेल्या या महिलेबाबत तिच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीचे धर्मांतर करून तिला बळजबरीने गोमांस खाण्यासाठी दिले जात होते. विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
यशोधरा उर्फ रुबीना असे दुर्देवी विवाहितेचे नाव आहे. यशोधरा ही मूळची मध्यप्रदेश राज्यातील कटणी येथील एका हिंदू कुटुंबातील तरुणी होती. २०१९ मध्ये रेहान खान हा तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला मुंबईत घेऊन आला होता. तिच्यासोबत लग्न करून धारावीतील राजीव गांधी नगर मध्ये राहत होता. रेहान याने यशोधरा हिचे नाव बदलून रुबीना असे ठेवले होते.या दोघांना दोन मुले असून एक मुलगा अडीच तर दुसरा केवळ चार महिन्यांचा आहे.
५ जानेवारी रोजी रुबीना उर्फ यशोधरा हिचा मृतदेह घरातील छताला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. धारावी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून रुबीना उर्फ यशोधरा हिच्या कुटुंबाचा शोध घेऊन या घटनेची माहिती दिली. यशोधरा हिचे वडील चंद्रभान खाटीक यांनी धारावी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात यशोधरा उर्फ रुबीना हिचा पती रेहान याच्यावर हत्येचा आरोप केला असून त्याने माझ्या मुलीला मारहाण करून तिला फासावर लटकावल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
आमच्यासाठी संपूर्ण जग हाच आपला स्वदेश आहे
आम्ही तुझ्या सगळ्या ऍलर्जीवर उपचार करू!
सर्वोच्च न्यायालयात आज या दोन मोठ्या प्रकरणांवर सुनावणी
“माझ्या मुलीला रेहानने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला मुंबईला घेऊन आला होता. त्यानंतर त्याने बळजबरीने तिचे धर्मांतर करून यशोधराचे रुबिना केले. त्यानंतर तिला गोमांस खाण्यासाठी तो बळजबरी करीत होता. दारू पिऊन तिला मारहाण करीत होता, असे यशोधरा हिने मृत्यूपूर्वी माझ्या मोठया मुलगा सतीश याला फोन करून कळविले होते. तेव्हाच आम्हाला आमची मुलगी धारावीत राहते असे कळले होते, असे वडील चंद्रभान यांनी धारावी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
याप्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून यशोधरा तथा रुबिनाचा मृतदेह सायन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हत्येप्रकरणी पती रेहान याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वपोनी. कांदळगावकर यांनी दिली.