कमिशनच्या लोभापायी एका तरुणीला तीन लाखांवर पाणी सोडावे लागले. कमिशनच्या मोहात तरुणीची एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केली. फसवणूक प्रकरणात चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवरील टास्क ऑर्डर कमिशनच्या बहाण्याने तरुणीकडून तीन लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.
कांदिवली येथे राहणाऱ्या एका तरुणीला व्हाट्सअपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने कॉल केला आणि फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवरवरील ऑर्डरवर कमिशन मिळवता येते, असे सांगितले. कमिशन मिळणार या मोहापोटी तरुणीने त्या व्यक्तीला टास्क पूर्ण करण्यास होकार दिला. तरुणीचा होकार मिळताच अज्ञात व्यक्तीने तरुणीला एक लिंक पाठवली. लिंकवरील माहिती भरून पाठवल्यास कमिशन मिळेल, असे तिला सांगण्यात आले. तरुणीने विश्वास ठेऊन लिंक ओपन केली आणि लिंक ओपन होताच तिला ६८ रुपये मिळाले.
हे ही वाचा:
जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे?
‘गो ग्रीन’ गणेशोत्सव; हव्यात चॉकलेट आणि शाडूच्या मूर्ती!
धाबे दणाणले; कोरोनाचे कारण देत पालिका निवडणुकाही पुढे ढकलण्याचा घाट?
आयएसआयएस-खुरासानने स्वीकारली काबुल बॉम्ब हल्ल्याची जवाबदारी
सुरुवातीची रक्कम मिळताच अज्ञात व्यक्तीने पॉपअप रिचार्ज म्हणून दोनशे रुपये भरण्यास सांगितले. विश्वास ठेऊन तरुणीने दोनशे रुपये भरले. पैसे भरल्यावर अजून टास्क करणार का, अशी विचारणा केली असता तरुणीने पैसे मिळतील म्हणून होकार दिला. पुन्हा रिचार्जच्या बहाण्याने दीड हजार रुपये तरुणीला भरण्यास भाग पाडले. तरुणीचा विश्वास बसावा म्हणून अज्ञात व्यक्तीने सतराशे रुपये कमिशन म्हणून तरुणीला दिले. अधिकचे कमिशन मिळावे म्हणून तरुणीने अजून तीन हजार रुपयांचे रिचार्ज केले.
तरुणीचा संपूर्ण विश्वास बसताच अज्ञात व्यक्तीने १२ ऑर्डर पूर्ण केल्यास जास्त कमिशन मिळते, अशी थाप तरुणीला मारली. तरुणीनेही यावर विश्वास ठेऊन १२ ऑर्डर्ससाठी तीन लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर तरुणीला कमिशन न मिळाल्यामुळे तरुणीने विचारपूस केली असता तुमच्या १० ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत आणि कमिशन १२ ऑर्डर्स पूर्ण झाल्यावरच मिळते असे सांगण्यात आले. त्यानंतर तरुणीने अज्ञात व्यक्तीकडे पैसे परत मागितले असता तिला नकार देण्यात आला. तरुणीने घडल्या प्रकाराची माहिती तिच्या मित्राला सांगितली असता त्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने चारकोप पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली.