अनेक समन्स पाठवूनही सातत्याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) गुंगारा देणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने आता लूकआऊट नोटीस जारी केल्याचे कळते आहे. म्हणजेच अनिल देशमुख हे फरार आहेत, यावर ईडीने शिक्कामोर्तब केले आहे.
१०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप असून त्यासंदर्भात ईडीने ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे म्हटले होते. त्याआधारावर ईडीने आपला तपास सुरू केला होता. अनिल देशमुख यांची काही संपत्ती ईडीने जप्तही केली आहे. त्यांना यासंदर्भात चौकशीसाठी ईडीने पाचवेळा समन्स बजावले, पण त्या समन्सला त्यांनी केराची टोपली दाखविली. यासंदर्भात मागे एकदा व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच समोर येऊ असे म्हटले होते. पण त्यानंतर अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, हे समोर आलेले नाही.
आता ही नोटीस जारी केल्यामुळे देशमुख यांचा शोध ईडी घेऊ शकेल. देशातील विविध विमानतळांना ही नोटीस पाठविण्यात आली असून तिथे देशमुख यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल.
हे ही वाचा:
केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण
गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१मध्ये ‘गृहप्रवेश’ वाढले
देशमुख यांना मिळालेल्या खंडणीपैकी साडेचार कोटी रुपये हे त्यांनी बनावट कंपन्यांमार्फत शैक्षणिक संस्थांकडे वळविल्याचेही समोर आले आहे. ईडीच्या तपासात या गोष्टी उघड झाल्या आहेत. याच प्रकरणात देशमुख यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिव सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. नुकतीच सीबीआयने देशमुख यांचे वकील ऍड. आनंद डागा यांना अटक केली असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डागा यांच्यावर आहे.