स्टार्टअपमधून यूनिकॉर्न बनलेली भारतीय कंपनी ‘बायजूस’च्या अडचणी वाढत आहेत. ईडीने बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे रवींद्रन आता देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. बायजूसवर फेमा अंतर्गत आरोप झाले असून ईडी त्याची चौकशी करत आहे.
याआधी रवींद्रन यांच्याविरोधात एलओसी ऑन इंटिमेशन जारी करण्यात आलं होतं. यात इमीग्रेशन अधिकारी एखाद्या व्यक्ती बाहेर जात असेल, तर संबंधित यंत्रणेला कळवतात. पण त्याला देश सोडण्यापासून रोखत नाही. आता लुकआऊट सर्कुलर जारी केल्यानंतर रवींद्रन देशाबाहेर जाऊ शकत नाहीत.
बायजूसवर फेमा अंतर्गत आरोप झाले असून ईडी त्याची चौकशी करत आहे. कंपनीवर २,२०० कोटी रुपये परदेशातून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय बेकायदेशीररित्या नऊ हजार कोटी रुपये देशाबाहेर पाठवले, असाही गंभीर आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे.
बायजूसची यापूर्वी देशातील यशस्वी स्टार्टअप म्हणून गणना होत होती. आता बायजूसच्या परदेशी फंडिंगची चौकशी सुरु झाली आहे. कंपनीवर मनी लॉन्ड्रिंगच्या पैशांची हेरा-फेरी केल्याचा आरोप आहे. कंपनीचे फाऊंडर बायजू रवींद्रन यांना आपली पेरेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी स्वत:ची आणि कुटुंबाची संपत्ती गहाण ठेवावी लागली आहे.
हे ही वाचा:
लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!
बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!
यापूर्वी ‘बायजू’ स्टार्टअपच्या अमेरिकेतील युनिटने अमेरिकन न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. या युनिटवर तब्बल १ अब्ज ते १० अब्ज डॉलर पर्यंतचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. बायजू रवींद्रनचे स्टार्टअप ‘बायजू’ हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्टअपपैकी एक होते. शिवाय २०२२ मध्ये त्याचे मूल्य २२ अब्ज डॉलर होते. त्यानंतर आता बायजूच्या काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की, स्टार्टअपचे मूल्यांकन हे ३ बिलियन डॉलर पर्यंत घसरले आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी बायजूचे सीईओ बायजू रवींद्रन यांना बोर्डातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत मिळत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.