पुतळा दुर्घटनेप्रकरणी फरार जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

सिंधुदुर्ग पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू

पुतळा दुर्घटनेप्रकरणी फरार जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील याला अटक केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई करत चेतन पाटील याला कोल्हापूरमधून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

गेल्या आवठड्यात मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला होता. त्यानंतर या प्रकरणात बांधकाम सल्लागार डॉ. चेतन एस पाटील आणि कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीचा मालक जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेतन पाटीलकडे पुतळ्याचा चबुतरा बांधण्याची जबाबदारी होती. त्याला अटक करण्यात आली आहे. पुतळा पडल्याची माहिती समोर येताच जयदीप आणि त्याच्या पत्नीने कल्याण येथील घराला कुलूप लावून घर सोडले होते. त्यानंतर जयदीप आपटेची पत्नी माहेरी गेली होती. परंतु, जयदीप आपटे याचा नेमका ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस सध्या त्याच्या कल्याणच्या घराबाहेर तळ ठोकून आहेत. अखेर सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटे विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे.

हे ही वाचा..

अरबी समुद्रात रेस्क्यू करायला गेलेल्या हेलीकॉप्टरला अपघात; तीन जण बेपत्ता

हिंदू विद्यार्थ्यांच्या कपाळावरील तिलक काढण्याचे प्रकरण : दोन शिक्षिका निलंबित

आपचे आमदार अमानतुल्ला खानला चार दिवसांच्या ईडी कोठडीत!

गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक

जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार केली असून पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहेत. तर, दुसरीकडे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला अटक झाली असून सध्या तो ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी देखील मागितली आहे.

Exit mobile version