मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिला कॉन्स्टेबलच्या नाव आणि सही असणारे कथित पत्र मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मागील दोन दिवसापासून व्हायरल होत आहे. या पत्रात पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर लैगिंग अत्याचाराचा कथित आरोप करण्यात आला आहे. मात्र व्हायरल पत्रातील मजकूर हा खरा नसून असला काहीही प्रकार घडलेला नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे, तसेच या पत्रातील महिला कॉन्स्टेबल च्या नावापुढील सह्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
मुंबई पोलीस दलात व्हायरल होणाऱ्या कथित पत्राबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश सोमवारी देण्यात आले आहे. खोटे आरोपाचे पत्र समाज माध्यामावर व्हायरल करून मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाईल व्हाट्सअँपवर मागील दोन दिवसापासून एक कथित पत्र व्हायरल होत आहे. या कथित व्हायरल पत्रात मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिला कॉन्स्टेबल यांच्या नावे टाकून त्यांची कथित सह्या करण्यात आलेल्या आहेत.
या पत्रात मोटार परिवहन विभागातील पोलिस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पुरुष कॉन्स्टेबल यांनी महिला कॉन्स्टेबलवर लैगिंग अत्याचार,तसेच त्यांचा गर्भपात केल्याचा कथित आरोप करण्यात आला आहे. या मजकुराचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त आणि मुंबईतील सह पोलीस आयुक्त यांना हे पत्र पोस्टाने पाठवण्यात आल्याची प्रत समाजमाध्यमावर तसेच पोलीस दलात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…
देशभरात २९,२७३ बनावट कंपन्या; ४४ हजार कोटींची जीएसटी चोरी
भारताच्या कठोर भूमिकेमुळे मालदीव उच्चायुक्तांची धावाधाव!
बांग्लादेशमध्ये पुन्हा शेख हसिना यांच्याकडे सत्ता
सोमवारी या व्हायरल कथित पत्राची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी यांनी पत्रात नमूद महिला कॉन्स्टेबल यांच्याकडे या कथित पत्राबाबत चौकशी केली असता हे पत्र बनावट असून महिला कॉन्स्टेबल यांच्या नावपुढील सह्या देखील बोगस असल्याचे समोर आले आहे. ज्या महिला कॉन्स्टेबलच्या नावांनी हे कथित पत्र लिहण्यात आली आहेत त्या प्रत्येकीकडे चौकशी करण्यात आली असून असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचे समोर आले आहे. हे कथित पत्र कोणी लिहले व व्हायरल करण्यामागचा त्याचा हेतू काय याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे आणि गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलेला आहे.
माध्यमांनी योग्य माहिती घ्यायला हवी होती!
दरम्यान, पोलिसांनी यासंदर्भात जे निवेदन जारी केले आहे त्यात हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहेच पण वर्तमानपत्रांनी किंवा प्रसिद्धी माध्यमांनी बातमी देताना योग्य माहिती घ्यायला हवी होती, असेही म्हटले आहे. व्हायरल कथित पत्राची आम्ही सखोल माहिती घेतली असता त्यातील कथीत अर्जदारांकडे चौकशी करण्यात आली,सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व बोगस सहीचा वापर करून कोणीतरी खोडसाळपणा करून जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात आले आहे. व्हायरल पत्रातील माहिती ही पूर्णपणे चुकीची आहे. अर्जात करण्यात आलेल्या नमूद करण्यात आलेला कुठलाही प्रकार मुंबई पोलीस दलात घडलेला नाही. खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेवून त्याचे विरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.