मालाड पश्चिम येथील गॅस एजन्सीमधून ज्येष्ठ नागरिकांच्या घरात गळक्या सिलेंडरचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.
गळक्या सिलेंडरबद्दल तक्रार करूनही गॅस एजन्सीने दुर्लक्ष केले आणि या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यावर एजन्सीकडून या प्रकरणात लक्ष घालण्यात आले. सिलेंडरच्या दुरुस्तीनंतरही गॅस गळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमतने म्हटले आहे की, श्री जी गॅस सर्विस एजन्सीने बबलू सरोज या व्यक्तीमार्फत मालाड पश्चिम येथील राठोडी परिसरातील चाळीत सिलेंडर पोहोचवला. सिलेंडर मधून गॅस गळती होत असल्याचे ग्राहकाच्या लक्षात आले; त्यांनी सरोज यांच्याकडे तक्रार केली असता वापरानंतर रेग्युलेटर बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र चार दिवसांनी गळती अधिक प्रमाणात होत होती म्हणून ग्राहकाने ‘लोकमत’च्या मार्फत तक्रार केली असता सिलेंडर बदलून दिला गेला.
परंतु तोच सिलेंडर दुरुस्त करून आल्याचा दावा केला परंतु जोडणी दरम्यान पुन्हा गॅस गळती झाल्याचे आढळून आले.
ग्राहकाच्या म्हणण्यानुसार सिलेंडर बुक करूनही एक आठवडा सिलेंडर मिळाला नाही. दरम्यान सरोजला त्या परिसरात पाहून सिलेंडर आणून देण्याची विनंती केली असता त्याने नकार दिला. पण काही वेळातच कोण्या दुसऱ्या व्यक्तीमार्फत त्याने सिलेंडर पोहचवला आणि त्या व्यक्तीने अधिकच्या पैशांची मागणी केली. या प्रकरणाबद्दल अधिकची चौकशी सुरू आहे असे श्री जी गॅस एजन्सीच्या बुकिंग अधिकारी ज्योती गुप्ता यांनी सांगितले.
दाटीवाटीच्या वस्तीमध्ये अशा प्रकारांमुळे सिलेंडर फुटला तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. सदर गॅस एजन्सी ही ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.