बाबा सिद्दीकींचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा लॉरेन्स बिश्नोईच्या शुटरचा दावा

दिल्लीमध्ये एका हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिश्नोई टोळीच्या योगेश कुमारला अटक

बाबा सिद्दीकींचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा लॉरेन्स बिश्नोईच्या शुटरचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत काही दिवसांपूर्वी हत्या झाली. यानंतर या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. दरम्यान, या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्लीमध्ये एका व्यायामशाळेच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिश्नोई टोळीच्या योगेश कुमारला नुकतीच अटक झाली. हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. “बाबा सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. तसेच त्यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे संबंध होते,” असा दावा योगेश कुमारने केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि मथुरा पोलिसांच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या चकमकीत योगेश जखमी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, दारूगोळा आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. चकमकीत पायाला गोळी लागल्याने त्याला मथुरेच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी हॉस्पिटलमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याने सिद्दिकी यांच्याबद्दल सांगितले.

“बाबा सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) आरोप होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटामागील व्यक्ती दाऊदशी त्यांचे संबंध होते. जेव्हा लोक अशा व्यक्तींशी जोडले जातात, तेव्हा काहीतरी घडणे निश्चितच होते. सिद्दीकी यांच्या बाबतीत असेच घडले,” असे योगेशने म्हटले.

हे ही वाचा..

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

एक धमकीचा संदेश आणि विमान कंपन्यांना करोडोंचे नुकसान

अभिनेत्री शामनाथच्या घरात आढळले अंमली पदार्थ

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यातील गावात बॉम्बस्फोट

गुन्हा करण्यापूर्वी गुन्हेगार माहिती गोळा करतात याबद्दल बोलताना योगेश म्हणाला की, “आजकाल मोबाईल फोन, इंटरनेट, गुगल आदी माध्यमे आहेत. या माध्यमातून एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेतले जाते.” पुढे तो असे म्हणाला की, आम्हाला थेट लक्ष्य दिले जाते. जो कोणी मार्गात येतो आणि काहीतरी चुकीचे करतो त्याला परिणाम भोगावे लागतील. बिश्नोई टोळी खूप मोठी आहे. १०० पेक्षा जास्त लोक या टोळीत आहेत. तसेच देशाबाहेरही आमचे काही सहकारी आहेत, असेही योगेशने सांगितले.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी आणखी पाच लोकांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे आरोपींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. या पाच आरोपींनी हल्लेखोरांना शस्त्र पुरविले होते. तुर्किये, ऑस्ट्रेलिया आणि देशी बनावटीचे हत्यार हल्लेखोरांना पुरविण्यात आले होते. तसेच हल्लेखोरांच्या राहण्याची व्यवस्था आणि त्यांना रसद पुरविण्याचे काम या पाच जणांनी केले होते.

Exit mobile version