ड्रग्स तस्कर ललित पाटील याला बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी ललित पाटील याची बुधवारी कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
ललित पाटील हा पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याची धक्कादायक बाब चौकशीतून उघड झाले आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना ललित सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
ललितवर ससूनमध्ये उपचार चालू होते आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या तैनात पोलिसांना तो पैसे द्यायचा. ससूनच्या बाहेर अनेकदा त्याचा भाऊ भूषण पाटीलला तो भेटायचा, अशी माहितीही या चौकशीतून समोर आली आहे. ज्या दिवशी तो ससूनमधून फरार झाला त्या दिवशी दीड तासात परत येतो असं सांगून तो बाहेर पडला आणि फरार झाला. त्यामुळे ललित पाटील प्रकरणात डॉक्टर आणि पोलीस सर्वच अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!
पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी
निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी अंधारेंची धडपड, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप!
“मी पळालो नाही, पळवण्यात आलं” ललित पाटीलचा आरोप
ललित पाटीलला कुणाचा राजकीय वरदहस्त होता का? याची चौकशी सुरू आहे. आपण पळून गेलो नसून आपल्याला पळवलं गेलं असा गौप्यस्फोट ललित याने मीडियाच्या कॅमेरासमोर केला होता. त्यामुळे ललित याला बाहेरून कोण मदत करत होतं याची चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या संपर्कात कोण कोण होतं? त्याला ससूनमध्ये भेटायला कोण कोण यायचं? याचीही चौकशी होणार आहे.