मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी-उर-रहमान लख्वी याला पाकिस्तान पोलिसांनी अटक केली आहे. लख्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर असून, त्याला २ जानेवारीला पाकिस्तान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पैसा गोळा करण्याचे काम लख्वी करत होता असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
२०१५ सालापासून जामिनावर बाहेर असलेल्या लख्वीला पंजाब प्रांतातील काऊंटर टेररिजम डिपार्टमेंट(सीटीडी) म्हणजेच पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. सीटीडीच्या म्हणण्यानुसार “पोलिसांनी केलेल्या दहशतवादी कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लख्वीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दहशतवादी कारवाया करण्यासाठी आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप आहेत.” लख्वी विरोधात लाहोर पोलीस ठाण्यात दहशतवादाला आर्थिक रसद पुरवण्याचे काम करत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
लख्वी दहशतवादासाठी जमा केलेल्या पैशातून एक दवाखाना चालवत होता. त्या दवाखान्यातून निर्माण होणाऱ्या पैशातूनही लख्वी दहशतवाद्यांना पैसे पुरवत होता. त्याच पैशातून तो त्याचा वैयक्तिक खर्चही भागवत असे. लख्वीला संयुक्त राष्ट्रसंघाने ‘दहशतवादी’ जाहीर केले होते. आता लख्वी विरोधात लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.