लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही अन्यथा कारवाई केली जाते. याच नियमाच्या आधारे पुणे आणि नागपूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि नागपूरमध्ये भरारी पथकाने लाखोंची रोख रक्कम जप्त केली आहे.
पुणे जिल्ह्यात ६५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी फॉरच्यूनर गाडीची तपासणी केली असता त्यावेळी त्यात १३ लाख ९० हजार ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत. तर, दुसऱ्या घटनेत शिरुर पोलिसांनी शहरातील कमान पुलाजवळ कारवाई केली आहे. या ठिकाणी एका खासगी वाहनातून ५१ लाख १६ हजार रुपये जप्त केले आहेत. अशाप्रकारे एकूण ६५ लाखांची रक्कम जप्त करुन ती कोषागारात ठेवण्यात आली आहे. आता प्राप्तीकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नागपूरमध्येही पथकाने रोकड जप्त केली आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीतून पोलिसांनी कारवाई करत १० लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची आहे आणि कशासाठी वापरली जाणार होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा:
इंडी आघाडीवाल्यांची ताकद वाढली तर देशाचे तुकडे-तुकडे करतील!
ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही
परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला
रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाचे पथक सज्ज झाले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवर या नियंत्रण पथकाचे लक्ष असणार आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या तसेच संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात मतदारांना मतदानासाठी मद्य तसेच पैशाचे आमिष दाखवले जाते. याला आळा बसावा याकरिता निवडणूक आयोगामार्फत कठोर अशी पावले उचलण्यात आली आहेत.