कानाच्या शस्त्रक्रियेसाठी भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच २८ वर्षीय महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात घडली. गौरी सुभाष पाटील असे मृत महिला पोलिसाचे नाव असून याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेकडील समतानगर परिसरात राहात असलेली गौरी २०१७ साली मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर रुजू झाली होती. ल विभाग मरोळ येथे नियुक्त असलेल्या गौरीचा गेल्या काही दिवसांपासून उजवा कान दुखत होता. त्यामुळे ती अंधेरी पश्चिमेकडील ॲक्सिस रुग्णालयात तपासणीसाठी गेली. येथील डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
कानाच्या शस्त्रक्रियेसाठी बुधवारी ती रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्या कानावर ३० ऑगस्टला शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास डॉक्टरांनी अचानक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गौरीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. येथे एका डॉक्टरने तिला भूल येण्याचे इंजेक्शन दिले. त्यानंतर अत्यवस्थ झालेल्या गौरीचा काही वेळातच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा करुन गौरीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवला. भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्याने गौरीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांकडे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर गौरीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४: नेमबाज मनीष नरवालने रौप्य पदकावर कोरले नाव !
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई
प्रीती पालने पदक जिंकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!
गौरीला उजव्या कानाचा त्रास सुरु होता. थंड काही खाल्ल्यानंतर तिच्या कानात पाणी यायचे. म्हणून तिने ॲक्सिस हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे जात कानाची तपासणी केली. तिच्या दोन पोलीस मित्रांवर ॲक्सिस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्या असल्याने तिने हे रुग्णालयात निवडले होते. गौरीला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर काही वेळातच डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली.
डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास गौरीची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले. रात्री पावणेदहाच्या सुमारास तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथे काही वेळाने तिला मृत घोषित करण्यात आल्याचे गौरीचा भाऊ विनायक पाटील यांनी सांगितले.