मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस दलातीलच पोलीस महिला शिपाईसह तिघांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे.
भाडोत्री मारेकऱ्यामार्फत तिने या पोलीस हवालदाराचा अपघात घडवून आणला होता. मात्र हा अपघात नसून ही हत्या असल्याचा संशयावरून पनवेल पोलिसांनी तपास सुरू करून महिला पोलीस शिपायासह तिघांना अटक केली आहे.
शिवाजी सानप असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शिवाजी सानप (५४) हे मुंबईतील नेहरू नगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. १५ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजता सानप यांचा मृतदेह पनवेल रेल्वे स्थानकाकडून मालधक्काकडे जाणाऱ्या रोडवर मृतदेह मिळून आला होता.
पनवेल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता सानप यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पनवेल पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. शिवाजी सानप हे पनवेल येथे कुटुंबासह राहात होते. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्याच्या पत्नीने व्यक्त केला होता. पनवेल पोलिसांनी या संशयावरून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका नॅनो मोटारीने सानप यांना धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले.
हे ही वाचा:
खाजखुजली आणि बिस्कीट वापरणारे चोरटे गजाआड!
आता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट
प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?
प्रवाशांच्या नाराजीनंतर नवे मार्ग शोधण्याचाच ‘बेस्ट’ पर्याय
दरम्यान, पोलिसांनी शिवाजी सानप हे घटनेच्या दिवशी पोलीस ठाण्यातून निघाले तेथून ते पनवेल पर्यंतचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शिवाजी सानप यांच्या कुर्ला स्थानकापासून दोघे जण सतत पाठलाग करीत असल्याचे समोर आले. पनवेल पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन दोघांना नवी मुंबई उलवे येथून ताब्यात घेण्यात आले.
विशाल जाधव (१८) आणि गणेश चव्हाण (२१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली देत पोलीस शिपाई शीतल पानसरे हिने शिवाजी सानप यांच्या हत्येची सुपारी दिली होती अशी कबुली दिली. या हत्येसाठी तिनेच नॅनो मोटार दिली होती, आणि हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नॅनो मोटार एका निर्जन ठिकाणी आणून जाळून टाकली अशी कबुली या दोघांनी दिली.
पनवेल पोलिसांनी मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र दलात असलेल्या शीतल पानसरे (२९) हिला अटक करून अधिक चौकशी केली असता शीतल पानसरे आणि शिवाजी सानप हे दोघे एकाच पोलीस ठाण्यात असताना दोघात व्यक्तिगत संबंध असल्याचे समोर आले. शीतलने शिवाजी सानप यांच्या विरोधात मुंबई, ठाणे नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल केले होते, अशी माहिती समोर आली आहे.